पुणे: पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात (Porsche crash case) प्रकरणात अल्पवयीन कारचालकावर प्रौढ म्हणून फौजदारी खटला चालवण्याची मागणी पुणे बाल न्याय मंडळांनी फेटाळल्यानंतर पुणे पोलीस सत्र न्यायालयात गेले आहेत. बाल न्याय मंडळाच्या निर्णयात त्रुटी असल्याचा दावा करून पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. कल्याणी नगर अपघात प्रकरणात कारचालकाचा गुन्हा निर्घृण श्रेणीत मोडत नसल्याचा निकाल बाल न्यायालय मंडळाने दिला होता. या निकालात स्पष्टता नसल्याचा दावा करून पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात अपील केले आहे. बाल न्याय मंडळाचा निकाल चुकीच्या गृहीतकावर आधारित असून त्यामध्ये स्पष्टता नाही. अल्पवयीन चालकाचा गुन्हा अगदी गंभीर श्रेणीत येत असून त्याच्यावर प्रौढ म्हणून फौजदारी खटला चालवण्यात यावा असे पुणे पोलिसांनी अर्जात म्हटले आहे. (Porsche crash case)
पोलिसांनी काय म्हटलंय?
गेल्या वर्षी पुण्यात एका अल्पवयीन चालकाने त्याच्या भरधाव वेगाने येणाऱ्या पोर्श कारने दोन जणांना उडवलं होतं. त्यानंतर पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे अल्पवयीन कारचालकावर प्रौढ म्हणून फौजदारी खटला चालवण्याची मागणी केली, मात्र बाल न्याय मंडळाने पुणे पोलिसांचा अर्ज फेटाळून लावला, ज्यामध्ये त्या आरोपी अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता बाल न्याय मंडळाच्या निर्णयात त्रुटी असल्याचा दावा करून पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. बाल न्याय मंडळाचा निकाल चुकीच्या गृहीतकावर आधारित असून त्यामध्ये स्पष्टता नाही. अल्पवयीन चालकाचा गुन्हा अगदी गंभीर श्रेणीत येत असून त्याच्यावर प्रौढ म्हणून फौजदारी खटला चालवण्यात यावा असं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलेलं ?
19 मे 2024 रोजी सकाळी पुण्यातील कल्याणी नगर परिसरात रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला होता. एका अल्पवयीन चालकाच्या पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली, ज्यामध्ये मध्य प्रदेशातील अश्विनी कोष्टा आणि अनीश अवधिया या दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातानंतर, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले परंतु बाल मंडळाने त्याला जामीन मंजूर केला. वडिलांनी आपल्या बळाचा वापर करून पुराव्यांशी छेडछाड केली होती, असा आरोप आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत होता. याशिवाय, असा आरोप आहे की अल्पवयीन मुलाच्या पालकांनी डॉक्टरांना लाच देऊन त्याच्या रक्ताचा नमुना त्याच्या आईच्या नमुन्याने बदलला.