Porsche Accident Case : 'रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल करणाऱ्या डॉक्टरांचा...; पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे केली मोठी मागणी
Porsche Accident Case : ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे.

पुणे: कल्याणीनगर भागामध्ये काही महिन्यांपुर्वी झालेल्या अल्पवयीन चालकाकडून घडलेल्या पोर्शे कार अपघात (Porsche Accident Case) प्रकरणात अनेक प्रकारे आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न झाले होते. त्याचवेळी अल्पवयीन आरोपी गाडी चालवताना नशेत होता का हे तपासण्यासाठी त्याचे रक्त देण्यात आले होते, तेव्हा ससूनमधील डॉक्टरांना पैसे देऊन अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. त्या प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट समोर आली आहे. ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे. रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल करणाऱ्या डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा यासाठी पुणे पोलिसांनी पत्र लिहलं आहे. या दोन्ही डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा, अशी मागणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे पत्राद्वारे केली आहे.(Porsche Accident Case)
पार्शे कार अपघात (Porsche Accident Case) प्रकरणात रक्त नमुने अदलाबदलीच्या आरोपावरून गुन्हा दाखल असलेले ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा, असे पत्र पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला पाठवले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांसह डॉक्टरांनीही आरोपीला मदत केल्याचे समोर आले होते. त्यानंतर गुन्हे शाखेने कारवाई करत दोघे डॉक्टर, शिपाई यांना अटक करण्यात आली होती. आता त्यांचा द्यकीय परवाना रद्द करावा असं पुणे पोलिसांनी पत्राद्वारे म्हटलं आहे.
अल्पवयीन आरोपी कारचालकाच्या रक्ताऐवजी त्याच्या आईचे रक्त तपासणीसाठी घेतले होते. या प्रकरणात सहभाग आढळून आल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. मागील दहा महिन्यांपासून दोन्ही डॉक्टर तुरुंगात आहेत. या दोन्ही डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा, अशी मागणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे पत्राद्वारे केली आहे.दरम्याने याच प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बडतर्फीचा प्रस्तावही पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवला आहे.
'त्या' दोन पोलिस अधिकाऱ्यांचा बडतर्फीचा प्रस्ताव
पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बडतर्फीचा प्रस्तावही पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठवला आहे. येरवडा पोलिस ठाण्यात हे दोन अधिकारी त्या वेळी कार्यरत होते. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून या दोघांना तेव्हा निलंबित करण्यात आले होते. त्यांची विभागीय चौकशी सुरू होती. विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यात दोघे दोषी आढळले आहेत. त्यानुसार त्यांना पोलिस खात्यातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठवला असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
प्रकरण काय?
कल्याणीनगरमध्ये 19 मे २०२४ च्या मध्यरात्री पबमधून पार्टी करून परत जात असताना अल्पवयीन कार चालकाने भरधाव वेगात कार चालवत एका दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात दुचाकी वरील तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर अपघातास कारणीभूत असलेल्या बड्या बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. राजकीय हस्तक्षेप आणि पैशाचा वापर करून अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्या होत्या. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे आई-वडिल, ससूनचे दोन डॉक्टर यांच्यासह दहा जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न आहे. पोर्शे अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाने दुचाकीवरून चाललेल्या तरूण आणि तरूणीला धडक दिली होती. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणामध्ये पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अग्रवाल यांच्या नातवाचे यात नाव समोर आले होते. आरोपी अल्पवयीन मुलाला शिक्षा म्हणून निबंध लिहण्याचे आदेश दिले त्यानंतर पुणेकरांनी संताप व्यक्त केला होता. अपघाताचा व्हिडीओ समोर आल्यावर आणि त्याला मिळालेली शिक्षा पाहून सर्वांनाच राग अनावर झाला. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणात कारवाई केली होती. बड्या बापाच्या मुलाला शिक्षा मिळाली होती.


















