पुणे : बारामती तालुक्यात पुन्हा एकदा प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान खाली पडल्याची दुर्घटना घटना घडली आहे. बारामतीतील गोजुबावी गावाच्या हद्दीत रेडबर्ड (Redbird) कंपनीचे प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान प्रशिक्षणासाठी उड्डाण करत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र नेमकं विमान कशामुळे कोसळलं, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिस आणि संबंधित यंत्रणा तातडीने दाखल झाल्या.
विमान कोसळल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. दुर्घटनाग्रस्त विमान शेतजमिनीत पडल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. विशेष म्हणजे, याच गोजुबाबी गावाच्या परिसरात यापूर्वीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच परिसरात विमान दुर्घटना घडल्याने चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, पोलिसांनी परिसराचा ताबा घेतला असून अपघातामागील नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. तर या विमानाची दुर्घटना घडली, त्या परिसरातील शेतात काम करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शी महिलेने नेमकं काय घडलं त्याची माहिती दिली आहे.
Baramati Training Aircraft Crash : त्या बाजूला ते विमान धडकलं, तारा तुटल्या...
विमान दुर्घटना घडली त्याठिकाणीच काम करणाऱ्या या प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की, 'आमच्या घराच्या मागच्या त्या बाजूने विमान आलं आणि या लाईटच्या खांबाला धडकलं. त्या खांबाची एक बाजू मोडली, त्या बाजूला ते विमान धडकलं, तारा तुटल्या. विमान धडकल्यावर आम्ही इथून उठून उभं राहिलो, विमान आलं म्हणेपर्यंत तिकडे गेलं आणि खाली घसरच गेलं आणि पडलं. त्या खांबाला धडकलं म्हणून त्याचं तोंड फिरलं. नाहीतर सरळ ऊसात गेलं असतं. पण खांबाला धडकलं त्यामुळं ते इथंच पडलं. मोकळं रानात वळवलं पण झाडाला आणि खांबाला धडकलं. खाली चिटकलं आणि घसरत गेलं. त्यामध्ये एकच पायलट होता, त्याला काहीही झाली नाहीये. त्याला काहीही खरचटलं नाही, पायलट आतच बसून राहिला, त्यानंतर त्याने विमानाचं दार उघडलं आणि खाली उतरला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी महिलेने दिली आहे.
Baramati Training Aircraft Crash : मला वाटलं आपटून स्फोट होईल, पण आपटलं नाही
पुढे महिला म्हणाली, पायलटने जरा वेळाने दार उघडल्यावर आम्ही विचारलं लागलं का काही? त्यावर त्यांनी नाही असं सांगितलं. मला काही झालं नाही असं ते म्हणाले. त्यानंतर जरा वेळाने सगळे लोक गोळे झाले, मी इथं तेव्हा एकटीच होते. महिला कामाला येणार होत्या म्हणून मी सकाळी शेतात भुईमूगाचे वेल काढण्याचं काम करत होते, आवाज आला तेव्हा खूप भीती वाटली, अजूनही काळीज धडधड करत आहे, दादा गेले तेव्हा आवाज कुठंपर्यंत गेलेला आता आज असं वाटलं काय होतं आणि काय नाही, काय कळतं नव्हतं. ते विमान फिरून माघारी येतंय का पुढे जातंय काहीचं कळेना. मी खालीच बसले, ते खाली पडलं तेव्हा मी तिथं गेले, आमच्या इथली माणसं तिथे आली ती मला म्हणाली तिथं जाऊ नको स्फोट वगैरे होईल. त्यांनी तसं सांगितलं तेव्हा मी मागं सरकले. इकडं येऊन उभी राहिले, जेव्हा जास्त माणसं आली तेव्हा मग मी त्यांच्यासोबत गेले, मला वाटलं आपटून स्फोट होईल, पण आपटलं नाही, खरडत गेलं, त्या पायलटला काय झालं नाही, पण फक्त घाबरला होता, त्या पायलटला काहीही झालं नाही, अशी माहिती विमान अपघात झाला त्या ठिकाणीच शेतात काम करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शी महिलेने दिली आहे.
Baramati Training Aircraft Crash : हवेतच फिरत होते, त्यानंतर या मोकळ्या जागेत कोसळले
दुसऱ्या एका व्यक्तीने या दुर्घटनेबाबत सांगितले की, "सकाळी साधारणपणे १०:३० ते १०:४५ च्या दरम्यान ही घटना घडली. आम्ही जवळच शेतात काम करत होतो. अचानक वरून एक विमान (ट्रेनर एअरक्राफ्ट) घरंगळत खाली येताना दिसले. खाली येताना ते विमान सरळ जमिनीवर आदळले नाही, तर ते हवेतच गोल फिरत होते आणि त्यानंतर या मोकळ्या जागेत कोसळले. सुदैवाने, वैमानिक आधीच विमानातून बाहेर पडले होते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली."
एका तरुणाने प्रत्यक्ष विमान कोसळताना पाहिले. त्याने सांगितले की, "विमान खाली येताना खूप मोठा आवाज झाला. विमान जमिनीवर पडताच त्याचा मोठा आवाज झाला. आम्ही घाबरलो होतो, पण नंतर तिथे जाऊन पाहिले तर वैमानिक सुरक्षित होते. विमान कोसळल्यानंतर त्यातून कोणताही मोठा स्फोट झाला नाही किंवा आग लागली नाही, पण विमानाच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले होते."
