लोणावळा : मिसिंग लिंकवर सेल्फी अथवा फोटो काढण्यास थांबणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असा इशारा महामार्ग पोलिसांनी दिला होता. त्यानंतर आज पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगेंनी मिसिंग लिंकवर (Mumbai Pune Expressway Missing Link) फोटो काढला अन् तो फेसबुकवर शेअर ही केला. त्यानंतर सर्व सामान्य जमतेने महापौर रवी लांडगेंसह महामार्ग पोलिसांना लक्ष केलंय. मिसिंग लिंकवर (Mumbai Pune Expressway Missing Link) ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने वाहनं धावतात, अशा प्रसंगी या मार्गावर वाहनं थांबवणं जीवावर बेतणारे ठरेल असं म्हणत महामार्ग पोलिसांनी सर्व सामान्य जनतेवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आणि गुन्हा दाखल करण्याचा इशारा ही दिला. (Mumbai Pune Expressway Missing Link)

Continues below advertisement

खरं तर महामार्ग पोलिसांची भूमिका योग्यचं आहे. पण याचं महामार्ग पोलिसांनी पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगेंना फोटो काढण्याची परवानगी दिली होती का? त्यांच्या वाहनावर दंडात्मक कारवाई केली का? गुन्हा दाखल केला का? किंवा तशी कारवाई करण्याचं धाडस महामार्ग पोलीस दाखवणार का? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेने उपस्थित केलाय. महामार्ग पोलिस व्हीआयपींबाबत वेगळं धोरण अवलंबत आहे का? असं म्हणायला आता वाव आहे. कारण भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंनी ही मिसिंग लिंकवर फोटो काढला होता. त्यांच्या वाहनावर ही महामार्ग पोलिसांनी कारवाई केली का? हे ही अस्पष्ट आहे. 

बहुचर्चित मिसिंग लिंक महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते लोकार्पण झालं. सह्याद्रीच्या पोटातून उभारलेला हा मिसिंग लिंग म्हणजे इंजिनिअरिंगचा अद्भुत आविष्कार आहे, 180 फुटी झुलता पुलावरुन निसर्गाचं सौंदर्य आकर्षित करणारं आहे. त्यामुळं या मिसिंग लिंकवरुन प्रवास करण्यासाठी प्रवासी उत्सुक होते. अखेर हा मिसिंग लिंक खुला झाला अन हा प्रवास अनुभवण्यासाठी मोठी गर्दी होऊ लागली. पण या मिसिंग लिंकवरुन ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने वाहनं धावत असल्यानं इथं थांबणं म्हणजे जीवाशी खेळण्यासारखं आहे. तरी सुद्धा अनेक प्रवासी हा जीवघेणा खेळ करतचं होते. म्हणून महामार्ग पोलिसांनी मिसिंग लिंकवर जीवघेणे सेल्फी-फोटो काढण्यासाठी थांबणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. 

Continues below advertisement

आधी दंडात्मक कारवाई ही केली, तरी वाहन चालक धजावत नव्हते. शेवटी गुन्हे दाखल करु असा इशारा महामार्ग पोलिसांनी दिला. पण हा इशारा देऊन चोवीस तास उलटायच्या आतचं पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगेंनी मुंबईला जाताना मिसिंग लिंकवर फोटो काढला आणि तो फेसबुकवर शेअर ही केला. त्यांच्या हे पोस्टवर सर्व सामान्यांनी टिकेची झोड उठवली. महापौरांसह महामार्ग पोलिसांवर सर्व सामान्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. महामार्ग पोलिसांनी महापौर रवी लांडगेंना मिसिंग लिंकवर थांबण्याची परवानगी दिली होती का? फोटो काढण्यासाठी मुभा दिली होती का? नसेल तर त्यांच्या वाहनावर दंडात्मक कारवाई केली का? गुन्हा दाखल केला का? सर्व सामान्यांच्या वाहनांवर जशी कारवाई करण्याचं धाडस दाखवलं तसं धाडस महामार्ग पोलिसांनी दाखवलं का? असे प्रश्न सर्व सामान्य जनतेने विचारलेत. आता महामार्ग पोलीस रवी लांडगेंच्या वाहनावर कारवाई करण्याचं धाडस दाखवणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंनी सुद्धा मिसिंग लिंकवर फोटो काढत तो फेसबुकवर शेअर केला होता. त्यांच्या वाहनावर ही महामार्ग पोलिसांनी कारवाई केली की नाही? हे सुद्धा अस्पष्ट आहे. हे पाहता महामार्ग पोलिसांचं सर्व सामान्य जनतेवर कारवाईचं धोरण आणि व्हीआयपींसाठी वेगळं धोरण आहे का? असं म्हणायला यानिमित्ताने वाव आहे.(Mumbai Pune Expressway Missing Link)