Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? पालिकेच्या कक्षात झळकले दोन्ही पवारांचे फोटो, दादांनी शेवटच्या क्षणापर्यंत विलीनीकरणाची चर्चा केल्याचाही दावा
Pimpri Chinchwad: विलीनीकरणाच्या दृष्टीने नव्हे तर पवार साहेब एक विचार आहेत आणि तो विचार जपण्यासाठी हा फोटो माझ्या दालनात कायम राहील, असं विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईरांचं म्हणणं आहे

पिंपरी चिंचवड : राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा रंगलेली असताना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेतील राष्ट्रवादीच्या दालनात शरद पवार आणि दिवंगत अजित पवारांचे फोटो लागले आहेत. त्यामुळं पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का? अशी चर्चा रंगलेली आहे. अजित पवार राष्ट्रवादीकडे पिंपरी चिंचवड पालिकेचं विरोधी पक्षनेते पद आहे. त्याचं दालनात शरद पवार आणि दिवंगत अजित पवारांचे फोटो लागलेत. मात्र हे विलीनीकरणाच्या दृष्टीने नव्हे तर पवार साहेब एक विचार आहेत आणि तो विचार जपण्यासाठी हा फोटो माझ्या दालनात कायम राहील, असं विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईरांचं म्हणणं आहे. (Pimpri Chinchwad)
मात्र दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, अजित दादा ही शेवटच्या क्षणापर्यंत तशी चर्चा करायचे. अजित दादांच्या अंतर्मनात ते विलीनीकरण नेमकं कोणतं? हे मला ठाऊक नाही, परंतु दादांची भावना मात्र तशाच प्रकारची होती. असा दावा भोईरांनी केला. आता विलीनीकरणाबाबतचा आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील, तो आम्ही मान्य करु असं भोईर म्हणालेत. विलीनीकरणाचा विषय सुनेत्रा वहिनी आणि सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे मिळून त्याचा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही भोईर यांनी म्हटलं आहे.(Pimpri Chinchwad)
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी
राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड कधी होणार याचीही उत्सुकता सर्वांनाच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानुसार, पदभार स्वीकारत कामाला देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे, आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड कधी होणार, अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा आणि उत्सुकता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह इतर पक्षातील नेत्यांनीही लागली आहे. त्यातच, काल (सोमवारी) सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख आणि नाव ठरलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीची तारीख ठरली असून 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. याच बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरुन दोन्ही राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि आमदार, खासदारांमध्ये काही प्रमाणात सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या आमदार, खासदार आणि प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भाने चर्चा करण्यात आली असून 26 फेब्रुवारी रोजी ही निवड करण्यात येणार असल्याचे समजते. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांचे नाव आघाडीवर होते, त्यातच केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनीही एका मुलाखतीत त्यांचं नाव घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू होती. मात्र, आता राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांचेच नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.
विलिनीकरणावर माध्यमांत चर्चा नको
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत विलिनीकरणाच्या संदर्भात तूर्तास चर्चा नाही. विलिनीकरणाच्या संदर्भात बाहेर माध्यमांमध्ये बोलू नये अशा सूचना बैठकीत आमदारांना दिल्या आहेत. पक्ष संघटना वाढ, राष्ट्रीय अध्यक्ष निवड आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संदर्भातील चर्चा आजच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे.

























