Pimpri Chinchwad: इंद्रायणी नदीच्या पुररेषेतील 36 बंगले जमीनदोस्त; भाजपचे माजी महापौर जबाबदार असल्याचा आरोप, जाधव म्हणाले...
Pimpri Chinchwad: एका महिलेने बिल्डर मनोज जरे सोबत भाजपचे माजी महापौर राहुल जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीच्या पुररेषेतील 36 बंगले जमीनदोस्त झाले. यानंतर रहिवाश्यांचा आक्रोश पहायला मिळतोय. यात एका महिलेने बिल्डर मनोज जरे सोबत भाजपचे माजी महापौर राहुल जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र माझा आणि भाजपचा ही मनोर जरेशी काही संबंध नाही. तो माझ्या भागातील असल्यानं मी त्याला ओळखतो. मी इथला लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळं हे रहिवाशी माझ्याकडे आले. तेव्हा हे बंगले अधिकृत करण्यासाठी मी प्रयत्न करेन असं त्यांना आश्वासन दिलं होतं, म्हणून त्यांनी माझ्यावर रोष व्यक्त केला, असं जाधव म्हणाले आहेत. पण आता जरे सोबत बैठक झालीये आणि येत्या दोन दिवसांत रहिवाश्यांची नुकसान भरपाई मिळवून देऊ, असं नवं आश्वासन भाजपचे माजी महापौर राहुल जाधव यांनी दिलं आहे.
इथल्या लोकांना आधार देण्याचं काम
एबीपी माझाशी बोलताना राहुल जाधव म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नोटीसा त्या रहिवाशांना आल्या, त्या नोटीसा आल्यानंतर ते सर्व रहिवासी माझ्याकडे आले. मनोज जरे यांनी ते प्लॉटिंग केलेलं होतं, त्यांच्यासोबत मोरे म्हणून देखील होते. जरे यांनी माझ्याकडे विनंती केली. आम्हाला महानगरपालिकेच्या या नोटीस आलेल्या आहेत, यातून आम्हाला तुम्ही मार्ग काढून द्या, मी एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे इथल्या लोकांना आधार देण्याचं काम किंवा त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम एक लोकप्रतिनिधी करत असतात त्याच प्रकारे मी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मला समजलं तेव्हा नोटीस आल्यानंतर ते रहिवासी माझ्याकडे आले होते. ते प्लॉटिंग काही निळ्या पुरेरेषेमध्ये झालं होतं, त्यानंतर त्यांना नोटीस आल्या. एक-दोन वर्षापासून मी त्या लोकांच्या संपर्कामध्ये आहे. मनोज जरे गाववाला आहे, तो चिखलीमध्ये राहतो, त्याची पहिल्यापासून ओळख आहे, जेव्हा त्या बंगल्यांना नोटीस आल्या, त्यानंतर मला समजलं त्यांनी ते प्लॉटिंग त्यांनी केलेलं आहे. त्या रहिवाशांनी मला सांगितलं त्यानंतर आम्ही एकत्रित येऊन त्या लोकांना कशी मदत देता येईल या प्रकारे आम्ही काही प्रयत्न केले.
त्या एका ताईने माझं नाव घेतलं
एक लोकप्रतिनिधी म्हणून जसा आपण आधार देतो, त्याच पद्धतीने मी त्यांना बोललो. येणाऱ्या काळात आपला बराच भाग जो पुरेरेषेत आहे तो रेसिडेन्शिअल होईल त्या प्रकारे तुमची घरे नियमित करण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी आमची चर्चा झाली होती. ती लोक खूप घाबरलेली होती. त्यांनी कोर्टातही केस केली होती, त्यानंतर हायकोर्टात देखील केस होती. सुप्रीम कोर्टामध्ये केस होती. त्याचबरोबर महानगरपालिकेने देखील नोटीसा दिल्या होत्या. त्यामुळे आधार देण्यासाठी मी त्यांच्यासोबत कायम राहिलो. त्यावेळी मी त्यांना हे देखील सांगितलं होतं, घाबरू नका आपण यावर पर्याय काढू. त्यामुळे त्या एका ताईने माझं नाव घेतलं. त्यांनी हाच शब्द लक्षात ठेवला की दादांनी आपल्याला सांगितलं होतं पर्याय काढू. आपण घर वाचवू. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पालिकेने त्या ठिकाणी कारवाई केली. कारवाई करण्याआधी मी म्हटलेलं घरे वाचवू, ताईने तेच लक्षात ठेवलं आणि त्यांनी माझं नाव घेतलं असेल असेही ते पुढे म्हणालेत.
नुकसान भरपाई द्यावी घराच्या, किंवा आर्थिक स्वरूपात
मनोज जरे हे व्यवसायिक आहेत. माझा, त्यांचा किंवा भाजपचा त्यांचा काही संबंध नाही. त्यांनी ते प्लॉटिंग केलं, त्यानंतर त्या नोटीस आल्या, त्यानंतर ते माझ्याकडे आले होते. म्हणून मी त्यांना बोलून घेतलं. आपल्याला या लोकांना न्याय द्यावा लागेल. त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी या लोकांसाठी मला मदत घ्यावी लागली. त्या त्या ठिकाणी मी त्यांना आश्वासित केले. आपण या लोकांना मदत केली पाहिजे. घरांवर कारवाई झाली आणि ते एवढे बंगलेवाले माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आज पर्यंत तुम्हाला मदत केली तशी पुढे भविष्यात देखील तशी मदत करत राहणार. एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक परिवार म्हणून मी लगेच जरे यांना बोलवून घेतलं. त्यांना सांगितलं या लोकांना जी मदत हवी आहे त्यांची जी मागणी आहे, जे नुकसान झालं आहे. ते नुकसान भरून द्यावे लागेल, असं मी त्यांना शब्द दिला आहे. आमची जी चर्चा झाली ती सर्वांसमक्ष झाली आहे. ज्यांची घरे पडली आहेत ते आणि स्वतः ज्यांनी प्लॉटिंग केले ते मनोज जरे त्याचबरोबर विशाल मोरे देखील त्यांच्यासोबत होते. त्यामुळे त्या दोघांनी या लोकांना जे काही नुकसान झालं आहे ते त्या लोकांची जी काही मागणी असेल त्यामध्ये त्यांना नुकसान भरपाई द्यावी ती घराच्या स्वरूपात असेल, किंवा आर्थिक स्वरूपात असेल, किंवा जागेच्या स्वरूपात असेल. कसंही जे त्या लोकांना परवडेल अशा पद्धतीने लोकांना नुकसान भरपाई देण्याचे ठरले आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
रहिवाश्यांची नुकसान भरपाई मिळवून देऊ
ज्या लोकांची घरी पडली आहेत, त्या लोकांच्या संपर्कात मनोज जरे आहेत आणि माझाही संपर्क त्यांच्याशी झाला आहे. म्हणून तर आमची एकत्रित बैठक झाली. ज्या लोकांची घरी पडली त्या बऱ्याच लोकांच्या संपर्कात मनोज जरे होते आणि त्यांचं बोलणं देखील झालं होतं, याची माहिती मला ज्यांची घरे पडली त्यांनी सांगितले आहे. घरे पडली त्या लोकांसोबत मी पहिल्यापासून होतो, भविष्यात देखील मी त्यांच्यासोबत राहणार आहे आणि त्यांच्याच बाजूने मी राहणार, त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये सर्वांना समजेल त्या लोकांना समाधानकारक मोबदला मिळालेला आहे, ज्यांचे बंगले पडले आहेत, त्यांच्या तोंडून हे तुम्ही ऐकाल असं आश्वासन देखील राहुल जाधव यांनी दिलं आहे. जरे सोबत बैठक झालीये आणि येत्या दोन दिवसांत रहिवाश्यांची नुकसान भरपाई मिळवून देऊ, असं नवं आश्वासन भाजपचे माजी महापौर राहुल जाधव यांनी दिलं आहे.
























