Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2026 : अखेर पिंपरी-चिंचवडमध्ये पवार काका-पुतणे एकत्र आले. याची अधिकृत घोषणा स्वतः अजित पवार यांनी करत, पवार कुटुंब पुन्हा एकत्र येत असल्याचं जाहीर केलं. मात्र या घोषणेचे राजकीय पडसाद केवळ राष्ट्रवादीपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर ते थेट महायुती आणि महाविकास आघाडीला हादरवणारे ठरणार आहेत.
मविआला सर्वात मोठा धक्का!
या घडामोडीत सर्वात मोठा धक्का तो महाविकास आघाडीला बसला आहे. कारण शनिवारपर्यंत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मविआचा अविभाज्य घटक होती. इतकंच नव्हे तर रविवारी मविआचा जागावाटपाचा अधिकृत फॉर्म्युला जाहीर होणार होता. मात्र त्याआधीच अजित पवारांनी मविआला जोरदार झटका दिला. परिणामी मविआचा ‘प्लॅन ए’ पूर्णपणे फसला आहे. आता मविआ ‘प्लॅन बी’कडे वळली असून, शरद पवार गटाला वगळून उर्वरित घटक पक्षांची आघाडी करून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू झाली आहे.
महायुतीतही खळबळ
ही घोषणा महायुतीसाठीही धक्कादायक ठरली आहे. अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची घोषणा करताच, भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि आठवलेंची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) यांची स्वतंत्र युती जाहीर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आजच या युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप–शिंदे सेना–आरपीआय युती विरुद्ध मविआ अशी तिरंगी लढत होणार, हे जवळपास निश्चित झालं आहे.
दोन्ही राष्ट्रवादींचं जागावाटप कसं असेल?
महापालिकेच्या 128 जागांपैकी अजित पवार गटाला 110, तर शरद पवार गटाला 18 जागा देण्यावर जवळपास एकमत झाल्याची चर्चा आहे. फारतर शरद पवार गटाच्या वाट्याला आणखी 2 ते 4 जागा वाढू शकतात. रणनीतीही ठरवली जात आहे. ज्या प्रभागात घड्याळ चिन्हाचे तीन आणि तुतारी चिन्हाचा एक उमेदवार आहे, त्या ठिकाणी चारही उमेदवार घड्याळावर लढतील. उलट जिथे तीन तुतारी आणि एक घड्याळाचा उमेदवार असेल, तिथे चारही उमेदवार तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील. तर ज्या प्रभागात दोन घड्याळ आणि दोन तुतारीचे उमेदवार असतील, तिथे आपापल्या चिन्हावर लढण्याचं ठरवलं जात आहे.
राष्ट्रवादी एकत्र येण्यापूर्वी मविआचा ‘प्लॅन ए’
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यापूर्वी मविआमध्ये जवळपास असा जागावाटपाचा ‘प्लॅन ए’ ठरला होता.
- काँग्रेस : 30 जागा
- ठाकरे गटाची शिवसेना : 35 जागा
- मनसे : 18 जागा
- इतर समविचारी पक्ष : 10 जागा
- शरद पवारांची राष्ट्रवादी : 35 जागा
मात्र आता ‘प्लॅन बी’मध्ये शरद पवार गटाच्या वाट्याच्या 35 जागांची विभागणी करण्यात आली आहे. या जागा नेमक्या कोणाच्या पारड्यात पडणार, यावर दिवसभरात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
महायुतीचं गणित अजूनही अडलेलं
महायुतीत भाजपकडून शिंदे गटाच्या शिवसेनेला 128 पैकी 14 जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे, तर आठवलेंच्या आरपीआयला 3 ते 5 जागा देण्याचा विचार आहे. आरपीआयचे सर्व उमेदवार कमळाच्या चिन्हावरच लढणार, हे जवळपास निश्चित झालं आहे आणि हीच आरपीआयची प्रमुख मागणी आहे. मात्र शिंदे शिवसेनेनं काही जागांसाठी ताणून धरल्यामुळे अद्याप युतीची औपचारिक घोषणा झालेली नाही. तरीही आज या युतीवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची जोरदार शक्यता आहे.
हे ही वाचा -
