Pimpri-Chinchwad : राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचे विश्वासू संजोग वाघेरे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. ते लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. संजोग वाघेरे माजी महापौर आणि माजी शहराध्यक्ष राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाघोरे उद्धव ठाकरेंच्या गोटात जाण्याची शक्यता आहे, हा अजित पवारांना पिंपरीत मोठा धक्का मानला जातो. वाघोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली, त्यावर अजित पवार म्हणाले की, कुणाची भेट घ्यायची, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, त्यामुळे आमच्याकडील लोकांना घेत असल्याची खोचक टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट -
पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता, वर्तवण्यात येत आहे. येथील संजोग वाघेरे यांनी आज (सोमवार, 25 डिसेंबर) शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर आणि माजी शहराध्यक्ष राहिलेले आहेत. आता त्यांना मावळ लोकसभा निवडणूक लढवायची आहे. महायुतीत त्या जागेसाठी निर्माण झालेली चुरस पाहता, त्यांना महायुतीतून तिकीट मिळण्याची शक्यता फारचं कमी आहे. त्यामुळं ते महाविकास आघाडीतून तिकीट मिळवण्यासाठी धडपड करतायेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी मावळ लोकसभेच्या तिकिटाबाबत त्यांनी चर्चा केली. ठाकरेंनी वाघोरे यांना तिकीट देण्याचं आश्वासन दिल्याची चर्चा आहे. संजोग वाघेरे लवकरच शिवबंधन बांधणार आहेत. तूर्तास तरी वाघेरेंनी उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केलेला नाही. पुढील दोन दिवसांत ते पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे.
भाजपच्या बाळा भेगडेंचा भावी खासदार असा उल्लेख, महायुतीत मावळ लोकसभेवरून तिढा निर्माण?
मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा वाढत चाललाय. शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंच्या जागेवर भाजपच्या बाळा भेगडेंनी दावा ठोकला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी लावलेल्या फ्लेक्सवर त्यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला. काही दिवसांपूर्वी स्वतः भेगडेंनी तशी ईच्छा व्यक्त केली होती. त्याचवेळी आमदार सुनील शेळकेंनी आम्ही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःकडे घेईल, असं म्हणत दावा केला. त्यामुळं शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंच्या अडचणी वाढताना दिसतायेत, यानिमित्ताने महायुतीत पेच निर्माण होणार हे उघड आहे.
महायुती अन् महाविकास आघाडीमध्ये लढत -
मावळ लोकसभा निवडणूकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांनी तयारी सुरु केली आहे. उमेदरांची चाचपणी सुरु आहे. कुणाचं पारडं जड आहे, याची चाचपणी केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्हीकडून कोणत्या उमेदराला संधी दिली जाते, याची उत्सुकता लागली आहे.