पिंपरी चिंचवड: पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे, अशातच त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad Election 2026) ही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार दिला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे (Anna Bansode) पुत्र सिद्धार्थ बनसोडेवर दोन हाफ मर्डरचे गुन्हे दाखल आहेत असं असताना प्रभाग क्रमांक 9 मधून अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिली आहे, असा आरोप सिद्धार्थ विरोधात लढणारे काँग्रेसचे उमेदवार उमेश खंदारेंनी केला आहे. पण अजित दादांना या गुन्ह्याची कल्पना आहे अन मला यात अद्याप दोषी ठरवलं नाही, असा दावा सिद्धार्थ बनसोडेंनी केला आहे. (Pimpri Chinchwad Election 2026)

 उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात ही माहिती सिध्दार्थने दिली आहे. 2021मध्ये दोन हाफ मर्डरचे, दंगा निर्माण केल्याचे गुन्हे दाखल असल्याचे आणि ते गुन्हे न्यायप्रविष्ट असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. अर्ज छाननीमध्ये ही माहिती पाहून खंदारे हे आरोप करत आहेत. असे उमेदवार देऊन अजित पवार जिल्हा गुन्हेगारी मुक्त कसे करणार आहेत? असा प्रश्न खंदारे उपस्थित करत आहेत. मात्र हे या गुन्ह्यात मला अद्याप दोषी ठरविण्यात आलेलं नाही. तीन वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यावर आत्ता चर्चा करण्यात अर्थ काय, आता मी वडिलांच्या सोबतीनं विकास कामांवर भर देत आहे. अजित दादांचे गुन्हेगारी मुक्त शहर करण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करु. असा दावा ही सिध्दार्थने केला. 

Pune Election 2026: कुख्यात गुंड आंदेकरांच्या घरात दोघींना तिकीट

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाकडून आयुष कोमकर हत्याप्रकरणात  तुरुंगात असलेल्या सोनाली (Sonali Andekar) आणि  लक्ष्मी आंदेकर (Laxmi Andekar) यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. या दोघीही तुरुंगातुन निवडणूक लढवणार आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणात दोघी तुरुंगात आहेत. तत्पूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आज गुंड गजा मारणेची (Gaja Marne) बायको जयश्री मारणेला हिलादेखील पुण्यातून (Pune news) उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आता गुन्हेगारीचा तगडा इतिहास असलेल्या आंदेकर कुटुंबातील दोघांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पुणे गुन्हेगारीमुक्त करेन, या अजित पवारांच्या शब्दावर कितपत विश्वास ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Pune Election 2026: भाजपनेही अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवलं, गुन्हेगारांना मानाचं पान दिलं

भाजपने कात्रजमध्ये आंबेगाव भागातील प्रभाग क्रमांक ३८ मधून उमेदवारी दिलीय ती देविदास चोरघेची पत्नी प्रतिभा चोरघेला. रोहिदास चोरघेंवर हत्येचे अनेक गुन्हे नोंद असून अपहरण, खंडणी, गोळीबार अशा गुन्ह्यांमध्ये तो आरोपी आहे. (Pune Mahangarpalika Election 2026)

रोहिदास चोरघे हा वेल्हे तालुक्यातील वांगणी गावचा असून त्याची वेल्हे तालुक्यात आणि पुणे शहरच्या दक्षिण भागात दहशत राहिली आहे. ७ फेब्रुवारी २००८ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता आणि इस्टेट एजंन्ट असलेल्या संदीप बांदलची हत्या केल्याचा गुन्हा रोहिदास चोरघेंवर नोंद करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून येरवडा कारागृहात डांबलं. ५ फेब्रुवारी २००११ ला आजारी असल्याचा त्यानं बहाणा केला. त्यामुळं त्याला उपचारांसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आलं. उपचारानंतर पाणी प्यायचं आहे असं म्हणून तो सोबत असलेल्या कॉन्स्टेबलला घेऊन पाण्याच्या टाकीजवळ गेला. त्याने आधी स्वतः पाणी प्यायलं आणि तो कॉन्स्टेबल पाणी पित असताना त्याला धक्का देऊन तो पळून गेला. त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. फरारी असलेल्या रोहिदास चोरघणे संदीप बांदल हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या अविनाश शिळीमकरला न्यायालयाच्या आवारात मारण्याचा कट रचला. साक्षीदार अविनाश शिळीमकर साक्ष देण्यासाठी फेब्रुवारी २०१२ ला पुणे सत्र न्यायालयात आला असता न्यायालयाच्या आवारातच चोरघे आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर गोळीबार केला ज्यामध्ये अविनाश शिळीमकरचा मित्र विजय कारके जखमी झाला. त्यानंतर रोहिदास चोरघे फरार होता. फरार असतानाच त्याने पुणे-बेंगलोर महामार्गावर असलेल्या आणेवाडी टोल नाक्यावर बंदुकीतून गोळीबार करून दहशत निर्माण केली. त्यानंतर पोलिसांनी रोहिदास चोरघेला वांगणी या त्याच्या गावातून अटक केली.