पुणे: निवडणूक प्रक्रियेबाबत राज्यासह देशातील नागरिकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार ती पाळत नसेल तर नागरिकांना त्याविरोधात आवाज उठविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं होतं. आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आढाव यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांनी देखील पुण्यात बाबा आढाव यांची भेट घेतली. यावेळी बोलताना अजित पवारांनी बाबा आढाव यांच्या प्रश्नांवरती स्पष्टीकरण दिल्याचं दिसून आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार प्रत्येकाला आपला मत मांडण्याचा अधिकार आहे. आपल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे बाबा आढाव यांनी आपल्या भूमिका मांडल्या. बाबा काही गोष्टी निवडणूक आयोगाची संबंधित आहेत. त्यांना स्वायत्तता दिलेली आहे. काही गोष्टी सुप्रीम कोर्टाची संबंधित आहेत. त्यांना जे योग्य वाटतं तसे निकाल त्यांनी दिलेले आहेत. ज्यावेळी निवडणुका होतात मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या. आमच्या 17 जागा आल्या. आम्ही मान्य केलं तोच निवडणुकीत जनतेचा कौल आहे. त्यावेळी ईव्हीएम बद्दल कोणी बोललं नाही. आम्ही पण बोललो नाही. आता माझं बारामतीतलच उदाहरण मी तुम्हाला देतो. बारामतीमध्ये मागच्या वेळी मी उभा केलेला उमेदवार 48 हजारांनी पडला आणि नंतर लगेचच पाच महिन्यांनी निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये मीच 48 हजारांची भरभरून काढून एक लाखाच्या वर मतांनी मी निवडून आलो. हा जनतेचा कौल आहे. जनता म्हणत होती लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. आता ती जनता आहे. जनतेला कोण धरणार. विधानसभेला तुम्ही गेला पाहिजेत असे मला मतदारांनी सांगितलं आता जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार असं उत्तर अजित पवारांनी बाबा आढाव यांना दिलं आहे.
हा जनतेचा कौल आहे. लोकसभेवेळी आणि आताही जनतेने वेगवेगळ्या कौल दिलेला आहे. तो आपण मान्य केला पाहिजे. आपण अनेकदा चर्चा केली आहे.आम्ही नेहमी तुम्हाला आदराने वागणूक दिलेली आहे. मला उमेदवार सांगतात आमचा पराभव झाला पण तो आमच्यामुळे झाला असेही सांगत असल्याचं अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले नाना पटोले परवा बोलताना म्हणाले होते, संध्याकाळी मतदान कसं वाढलं, पाच वाजण्याच्या मतदान करण्यासाठी रांगेत आले. त्यांना आतमध्ये घेतल्यानंतर मतदान वाढलं. सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत मतदान झालं होतं. पाच टक्के संध्याकाळी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत त्यावेळी मतदान टक्केवारी एकदम 15 टक्क्यांनी वाढली. त्यात आमचा काय दोष आहे. मतदारांनी कधी करण्यात यायचं आणि कधी मतदान करायचं हे ठरवू शकत नाही आणि मतदारांना साद घालत होतो. मतदान करायला जावा. मात्र., ते कारण देत होते त्यांना हवं तेव्हा ते मतदानासाठी जात होते, असंही मतदान टक्केवारी वाढण्यावर स्पष्टीकरण देत अजित पवार यांनी म्हटलं आहे.
पैशाच्या वारे माप वापरावर अजित पवार बोलताना म्हणाले, लोकसभेला पराभव झाल्यानंतर मी माझ्या लोकांना घेऊन बसलो होतो. आपण काही चांगल्या पद्धतीने लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आणि त्याचा काही परिणाम होतो का बघायचा. जात-पात धर्म असं काही भेदभाव करायचा नाही गरीबांसाठी योजना कारायच्या असं ठरवलं. मी माझ्या टीम सोबत बसलो माझं साडेसहा लाख कोटीचं बजेट होतं. त्यातून 75000 कोटी बाजूला काढा आणि 45 हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींना द्यायचे आहेत. पंधरा हजार कोटी रुपये त्या वीज माफीसाठी द्यायचे आहेत. बाकीचे तीन गॅस सिलेंडर आणि बाकी योजना साठी द्यायचे आहे. तो भार आपल्याला उचलावा लागेल दहा टक्के बचत केली तर आपले 65 हजार कोटी रुपये वाचतात, आम्ही तसे निर्णय घेतले योजनांमध्ये दिले ते आमच्या घरच्या पैसे नव्हते ते जनतेचे पैसे होते असंही अजित पवार म्हणालेत.
आम्हाला शिवराज चव्हाण यांनी सांगितलं आमच्या इथे लाडली बहना ही योजना प्रसिद्ध झाली आणि ते तिथं गेली अनेक वर्ष मुख्यमंत्री राहिले आहेत. कर्नाटक मध्ये देखील काँग्रेस पक्षाने योजना दिल्या. पंजाबनेही अनेक योजना दिल्या. त्याचबरोबर दिल्लीतले मुख्यमंत्री अरविंद केजवाल म्हणतात वीज मोफत, पाणी मोफत वगैरे. काही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारने योजना दिल्या आहेत. आम्ही तशा योजना दिल्या आहेत. विरोधकांचा जाहीरनामा आला त्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये केले. त्यांनी तीन हजार रुपये देण्याचं देखील एक प्रकारे प्रलोभन दाखवला आहे. तुम्ही जसं आम्हाला दोष देत आहात तसं त्यांनी देखील तीन हजार रुपये देण्याचा प्रलोभन दाखवलं होतं, असेही अजित पवार यांनी बोलताना म्हटला आहे.
तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता बाबा तुम्ही आदरणीय व्यक्ती आहात. तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता. तो तुमचा अधिकार आहे तो तुम्हाला लोकशाहीने दिलेला आहे पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, असंही अजित पवार म्हणाले.