Artist Ravi Paranjape Death: ख्यातनाम चित्रकार रवी परांजपे यांचे अल्प आजाराने निधन झाले आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  ते ८७ वर्षांचे होते. वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात या क्षेत्रात त्यांनी उत्तम कामगिरी बजावली होती. भारतीय चित्रकलेच्या शैलीतील ख्यातनाम चित्रकार अशी त्यांची ओळख होती.


चित्रकलेबरोबरच त्यांचं लेखनसुद्धा प्रसिद्ध आहे. जागतिक प्रसिद्ध असलेल्या अनेक नियतकालिकांमध्य़े त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध आहे. ब्रश मायलेज’ हे आत्मकथन तसेच परदेशी चित्रकारांचा परिचय करून देणारे शिखरे रंगरेषांची आणि नीलधवल ध्वजाखाली हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे.


 


कम्युनिकेशन आर्ट्‌स गिल्ड हॉल ऑफ फेम’चा जीवनगौरव


रवी परांजपे यांना ‘कम्युनिकेशन आर्ट्‌स गिल्ड हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता.  त्यांच्या ‘द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला मिळालेला 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांना यासोबतच अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. दयावती प्रतिष्ठानचा पुरस्कार तसंच ‘ब्रश मायलेज’ या पुस्तकासाठी भैरूरतन दमाणी पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.


विविधांगी चित्रकलेची आवड


रवी परांजपे हे बोधचित्रकार म्हणून ओळखले जात होते.  बोधचित्रकला, लावण्य योजना कला (डिझाईन), वास्तुबोधचित्रकला आणि स्वान्त सुखाय सृजनात्मक चित्रनिर्मिती या सर्व प्रकारच्या चित्रनिर्मितीमध्ये त्यांचा हातखंडा होता. अभिनेते अमिताभ बच्चन, पंडित जसराज यांच्यासारख्या अनेक दिग्गजांकडे त्यांने चित्रे आहेत. त्याचबरोबर जगभरात त्यांच्या चित्राचे चाहते आहेत.