पुणे: जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यामध्ये पुण्यातील लहानपणापासूनचे जिवलग मित्र संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा निष्पाप बळी गेला. बालपणापासूनच्या या मैत्रीचा शेवट मात्र, दुर्दैवी झाला. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी गणबोटेंच्या पत्नीने व वाचवण्यासाठी केलेली धडपड आणि थरारक प्रसंग सांगितला आहे. त्या हल्लेखोरांनी विचारलं  'अजान पढता है क्या, पढता है क्या कुछ?' त्याच बोलण ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि आम्ही सगळे अल्लाह हू अकबर म्हणायला लागलो, असंही त्यांनी पुढे सांगितलं. 

कपडे काढून गोळ्या झाडल्या

कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवार यांच्या समोर अंगावर काटा आणणारा अनुभव सांगताना म्हणाल्या, संतोष जगदाळे यांचा परिवार आणि आम्ही (गणबोटे परिवार) सोबत होतो. ते कुराणवरून काहीतरी तिथं झालं होतं. हल्लेखोरांनी आम्हाला अजान वाचायला सांगितलं. आम्ही सगळ्या महिलांनी तिथं मोठमोठ्यांनी अजान म्हटलं. मारणारे चार जण होते. तिथे एक जण मुस्लीम घोडेवाला होता, त्याने त्या हल्लेखोरांना विचारलं. या निष्पाप लोकांना का मारत आहात. त्यांनी काय चुक केली आहे. त्यानंतर त्याच्यावरती कपडे काढून गोळ्या झाडल्या. तो मुस्लीम घोडेवाला आम्हाला वाचवत होता, पण त्यालाही मारलं. 

आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि...

आसावरीने अनेकांच्या ओळखी काढून मदत घेतली. आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली, सैन्य दलाची देखील मदत झाली. पण ती उशिरा झाली. तोपर्यंत हे गेले होते. माझ्या समोर गोळ्या घातल्या, तुम्ही अजान वाचा म्हणून सांगत होते. आम्ही तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या मोठ्या अजान म्हटलं. पण, त्यांनी आमच्या माणसांना मारलं. तिथे गेटवर एक मुस्लिम होता. तो म्हणत होता तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारता. त्यांनी काय चुक केली आहे? त्याला सुद्धा पुढे करून गोळ्या घातल्या. आम्ही तिथं घोड्यावर बसून गेलो तरी आम्हाला भीती वाटत होती. आम्ही पळत सुटलो तिथून तर चिखलात गुडघ्याइतके पाय खाली रुतत होते. आमच्या घोड्यावाले मुस्लिम होते पण ते खूप चांगले होते. ते आम्हाला हल्ला झाल्यानंतर आम्हाला घ्यायला आले. त्यांचा मित्र बाजूला होता. त्याला बोलावून घेतलं आणि म्हणाला 'अजान पढता है क्या, पढता है क्या कुछ?' त्याच बोलण ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि आम्ही सगळे अल्लाह हू अकबर म्हणायला लागलो, असंही त्यांनी पुढे सांगितलं. 

महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात  डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय.  तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.

महाराष्ट्रातील मृतांची नावे

1) अतुल मोने - डोंबिवली2) संजय लेले - डोंबिवली3) हेमंत जोशी- डोंबिवली4)  संतोष जगदाळे- पुणे5)  कौस्तुभ गणबोटे- पुणे6)   दिलीप देसले- पनवेल

जखमींची नावे- 1) एस बालचंद्रू2) सुबोध पाटील3) शोबीत पटेल