पुणे: नीटची परिक्षेचा घोळ त्यानंतर फेक सर्टिफिकेट दाखवून IAS झालेल्या पुजा खेडकरचं प्रकरण गाजत असतानाच पुण्यातील खानापूर शहरातील मेडिकल इस्टिट्यूट (medical institute) देखील बोगस असल्याचं समोर आलं आहे. ओरॅकल नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूट, हिम्स मेडिकल अकॅडमी, असं या इस्टिट्यूटचं नाव आहे. विद्यार्थ्यांना खोटे सर्टिफिकेट दाखवून आणि केंद्र शासन आणि राज्य शासन किंवा तत्सम शासकीय संस्थेची किंवा विद्यापीठाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अनधिकृतपणे चालवून विद्यार्थ्यांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
इन्स्टिट्यूटवर (medical institute) फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आयुष संचालनालयाकडून संस्थेला आता टाळं ठोकण्यात आलं आहे. मात्र या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे लाखो रुपये अडकून पडले आहेत. या संस्थेकडून विविध कोर्सेस प्रामुख्याने पॅरामेडिकल कोर्सेसच्या नावाखाली 8 ते 12 लाखांची फी उकळली जात होती. सध्या तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी आहेत. काहींनी तर कर्ज काढून पैसे भरलेले आहेत. त्यामुळे आमची फी परत करा, अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओरॅकल नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूट तथा हिम्स मेडिकल अकॅडमी ही खानापूर येथील खानापूर पानशेत रस्त्यावरील मनेरवाडी, ता. हवेली येथे गेल्या वर्षी सुरू झाली आहे. त्याआधी ती नांदेड सिटी, सिंहगड पायथा येथे वेगवेगळ्या नावांनी सुरू होती. त्याचबरोबर दर सहा महिन्याला या इन्स्टिट्यूटच्या नावात बदल करून त्यांना इतर राज्यांतील विद्यापीठाची मान्यता असल्याचे सांगून त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस सुरू करण्यात आलेले होते. त्यामध्ये प्रामुख्याने बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स (बीएनवायएस), बॅचलर ऑफ फिजिओथेरपी तसेच पीजी कोर्सेस जसे एमडी न्युट्रिशन अँड डायटिशियन, क्लिनिकल नॅचरोपॅथी, यासारखे कोर्सेस चालवले जात होते.
जेव्हा विद्यार्थ्यांनी फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर वैद्यकीय विभागाने पुण्यातील आयुष संचालनालयाच्या सहायक संचालक वैद्य अनिता कोल्हे आणि मुंबईतील आर. ए. पोतदार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे प्रमुख मनोज गायकवाड यांनी या ओरॅकल इन्स्टिट्यूटची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या महिन्यात संस्थेची चौकशी केली आणि संस्थाचालक सुनील चव्हाण यांच्याकडेही चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतेही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यानंतर या इन्स्टिट्यूटवर कारवाई करत टाळं लावण्यात आलं.
याबाबत न्याय मिळवून देण्यासाठी सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती मागणी
ओरॅकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, हिम्स मेडिकल अकॅडमी या मणेरवाडी फाटा, खानापूर येथील नॅचरोपॅथीची पदवी देण्याचा दावा करणाऱ्या कॉलेजवर आयुष विभागाने फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. यामुळे या कॉलेजला टाळे ठोकण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम चालविण्यासाठी सदर संस्थेने कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती. या कारवाईमुळे येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांनी कर्ज, उधार उसनवारी करुन फी भरली होती. आता हे कॉलेजचं बंद झाल्याने त्यांची फी अडकून राहिली. पूर्वीचे शैक्षणिक कर्ज असल्यामुळे, नवीन कर्ज मिळत नाही आणि त्यामुळे नवीन ठिकाणी ऍडमिशन देखील घेता येत नाही, ही स्थिती आहे. याखेरीज सदर संस्थेने या विद्यार्थ्यांची ओरीजनल कागदपत्रे ठेवून घेतली आहेत. हा अतिशय गंभीर प्रकार असून मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून सदर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती.