Old Pune-Mumbai highway Accident :  जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) खासगी बस (Private bus) दरीत कोसळल्याची (Accident) घटना घडली आहे. यात 13 जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर 29 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. सोबतच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत आणि जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करणार असल्याचं जाहीर केलं आहे. 


देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली...


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातात मृत्यू झालेल्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एक खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याअपघातात 29 जण जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. मृतांच्या कुटुंबियांप्रति माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतला आहे. सर्व जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालय व एमजीएम हॉस्पिटल येथे तातडीने उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचारासाठी स्थानिक प्रशासन समन्वय ठेवून आहेत. जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी राज्य सरकार सातत्याने संपर्कात आहे. या खाजगी बसमध्ये बाजीप्रभू ढोल पथक, गोरेगाव (मुंबई) येथील सदस्य होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे. दरीतील बस बाहेर काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकार या कुटुंबियांच्या पाठीशी आहे, असं ट्वीट करत त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 


 






मृत्यू पावल्याची घटना दुर्दैवी- अजित पवार 


विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्वीट करत शोक दु:ख व्यक्त केलं आहे. 'जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोरघाटात खासगी बस दरीत कोसळून प्रवासी मृत्यू पावल्याची घटना दुर्दैवी, वेदनादायक आहे. घटनेतील जखमींना तात्काळ उपचार मिळून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, ही प्रार्थना. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत', असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.






मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली : सुप्रिया सुळे


त्यसोबतच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या अपघातााबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली केली आहे. 'जुन्या मुंबई-पुणे मार्गावर बस दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये काही प्रवासी मृत्युमुखी पडल्याची बातमी अतिशय दुःखद व दुर्दैवी आहे. या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमी प्रवासी बरे होऊन सुखरुप घरी परत यावे ही पांडूरंगाच्या चरणी प्रार्थना', असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.