Pune Cyber Crime News : पुण्यात सायबर फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman AI Video) यांचा एआय डीपफेक (AI Deepfake) व्हिडीओ, त्यावर दाखवण्यात आलेली बनावट गुंतवणुकीची माहिती आणि त्यावर विश्वास ठेवून लाखो-कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक... असा प्रकार घडला. पुण्यात अशाच प्रकारे एका व्यावसायिकाला तब्बल एक कोटी सात लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच पद्धतीने यापूर्वी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचीही सुमारे एक कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. Deepfake च्या माध्यमातून विश्वास संपादन करून नागरिकांना गुंतवणुकीच्या जाळ्यात ओढलं जात असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.
Deepfake Scam Modus Operandi : नेमका कसा रचला?
सोशल मीडियावर स्क्रोल करताना अचानक एक व्हिडीओ समोर येतो. या व्हिडीओमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दिसतात. त्यामध्ये गुंतवणुकीच्या संधींबद्दल त्या माहिती देत असल्याचं दिसतं. हा व्हिडीओ अगदी खरा वाटतो, पण तो खराखुरा नव्हता तर तो होता AI Deepfake. याच डीपफएक व्हिडीओच्या (Deepfake VIDEO) माध्यमातून पुण्यातील एका व्यावसायिकाला सायबर भामट्यांनी आपल्या जाळ्यात ओढलं.
जून महिन्यात व्यावसायिकाच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा व्हिडीओ असलेली जाहिरात समोर आली. व्हिडीओ पाहून त्याने लिंकवर क्लिक केलं. यानंतर त्याच्याशी एका कथित इ्न्व्हेस्टमेंट एक्झिक्युटिव्हने (Investment Executive) संपर्क साधला.
फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये (Forex Trading) मोठा परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. सुरुवातीला काही हजार रुपये गुंतवल्यानंतर त्याच्या खात्यावर नफा झाल्याचं दाखवण्यात आलं. इतकंच नाही तर विश्वास बसावा म्हणून त्याच्या खात्यात एक हजार रुपये प्रत्यक्ष जमा करण्यात आले. म्हणजे आधी विश्वास जिंकायचा आणि त्यानंतर मोठी रक्कम गुंतवायला लावायची.
यानंतर सुरू झाला फसवणुकीचा खरा खेळ. सायबर भामट्यांनी इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या स्पेस एक्स (SpaceX) कंपनीच्या शेअर्समध्ये Pre-IPO गुंतवणुकीची संधी असल्याचं सांगितलं. मोठा नफा मिळेल, असं सांगत या पुणेकराकडून वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे भरून घेण्यात आले. 2 जून ते 23 जुलैदरम्यान तब्बल 36 व्यवहारांतून 1 कोटी 7 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.
दरम्यान, आरोपींनी तयार केलेल्या बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर त्याला तब्बल 3 कोटी 98 लाख रुपयांचा नफा झाल्याचं दाखवण्यात आलं. सुरुवातीला सुमारे 7 लाख रुपये काढण्याची परवानगी देऊन आरोपींनी त्याचा विश्वास आणखी पक्का केला. पण जेव्हा संपूर्ण रक्कम काढण्याची वेळ आली, तेव्हा वेगवेगळ्या नावाखाली अतिरिक्त पैसे मागण्यात आले आणि त्यानंतर आरोपींनी त्या संपर्कच तोडला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं पीडिताच्या लक्षात आलं.
Deepfake Target Personalities : उद्योजकांच्या चेहऱ्याचा वापर करून फसवणूक
मात्र हा काही एकमेव प्रकार नाही. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या वापर करून देखील अशीच फसवणूक करण्यात आली आहे. आता सर्वात मोठी चिंता म्हणजे सायबर गुन्हेगार केवळ राजकीय नेत्यांच्याच चेहऱ्याचा वापर करत नाहीत, तर उद्योगजगतामधील प्रसिद्ध व्यक्तींचेही Deepfake VIDEO तयार करून नागरिकांचा विश्वास संपादन करत आहेत. या बनावट व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना वेगवेगळ्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स (Trading Platforms) आणि गुंतवणुकीच्या योजनांमध्ये (Investment Schemes) पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केलं जातं.
म्हणून सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ पाहिला, त्यात मोठ्या व्यक्तीने गुंतवणुकीचा सल्ला दिला किंवा कमी वेळात मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवलं, तर लगेच विश्वास ठेवू नका. तो व्हिडीओ कितीही खरा वाटत असला तरी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सत्यता तपासा. पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी संबंधित कंपनी आणि प्लॅटफॉर्मची अधिकृत माहिती तपासा. चेहरा ओळखीचा असला, आवाज ओळखीचा असला, तरी व्हिडीओ खरा आहेच असं समजू नका. कारण तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरचा ‘विश्वास’ काही सेकंदात तुमच्या आयुष्याची कमाई गमावू शकतो.
ही बातमी वाचा:
