पुणे :वैष्णवी हगवणे (Vaishnavi hagawane) प्रकरणात आरोपी असलेल्या बंदूकधारी निलेश चव्हाणला अटक करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश मिळालं आहे. अँडी गुंडा स्क्वॉड आणि पुणे क्राइम ब्रांच यांनी संयुक्तपणे कारवाई करत निलेशला थेट नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलं आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर बावधन पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यानंतर तो पोलिसांना (police) शरण येण्याऐवजी फरार झाला होता. फरार झाल्यानंतर 21 मे रोजी निलेश चव्हाण पुणे (Pune) आणि महाराष्ट्रातून बाहेर गेला  अखेर 10 दिवसानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलंय. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या बाळाचा ताबा निलेशकडे होता. मात्र, बाळाचा ताबा मागण्यासाठी वैष्णवीच्या आई-वडिलांनी त्याच्याकडे मागणी केली असता, निलेशने बंदुकीचा धाक दाखवून त्यांना हुसकावून लावले होते. अखेर, माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर पोलिसांनी आरोपी निलेशवर देखील गुन्हा दाखल केला आहे.  

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी हगवणे कुटुंबातील सर्वच आरोपींना अटक केली असून सध्या ते पोलीस व न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, या प्रकरणात वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाण गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. 21 मे रोजी निलेश महाराष्ट्राबाहेर केला होता. त्यानंतर,  25 मे रोजी खासगी ट्रॅव्हल्सने तो उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथून दिल्लीला गेला. ज्या बसने तो प्रवास करत होता, त्या वातानुकूलित बसमधील प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात निलेश चव्हाण दिसून येत आहे. स्लीपर सीटवरुन उतरत असताना, हाती पाण्याची बाटली घेतलेला निलेश चव्हाण बिनधास्तपणे फिरताना पाहायला मिळत आहे. 

निलेश चव्हाणने पुणे, मुंबई, कर्जत, रायगड असा प्रवास केला, रायगडनंतर त्याने 21 मे रोजी महाराष्ट्राबाहेर म्हणजेच दिल्ली गाठली होती. 25 मे रोजी त्याने दिल्ली ते गोरखपूर प्रवास केला. त्यानंतर, सोनोली (उत्तरप्रदेश), भैरवा (नेपाळ) आणि काठमांडू येथे पोहोचला. नेपाळमधून भैरवा मार्गे सोनोलीमध्ये आल्यावर निलेश चव्हाणला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे निलेश चव्हाण हा 25 मे रोजीच्या दुपारपासून 30 मे पर्यंत नेपाळमध्येच मुक्कामी होता. 

बाळाचा कायदेशीर ताबा आजीकडे

पुण्यातील स्वर्गीय वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती (Fit Person) म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे. यापुढे स्व. वैष्णवी हगवणे यांचा मुलगा कु. जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी स्वाती कस्पटे यांची असेल, असे समितीने म्हटलं आहे.

हेही वाचा 

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मे 2025 | शुक्रवार