पुणे: लंडनमध्ये नोकरी लागलेल्या प्रेम बिऱ्हाडे (Prem Birhade) या तरुणाने पुण्यातील जिथून त्याने पदवीचं शिक्षण घेतलं त्या मॉडर्न महाविद्यालयावर गंभीर आरोप केले आहेत. त्याने या संबंधी एक काही व्हिडीओ शेअर (Video) करत दावा केला आहे की “मला लंडनमधील एका कंपनीत नोकरी मिळाली होती. मात्र, त्या कंपनीने मी ज्या महाविद्यालयातून पदवी मिळवली आहे त्या महाविद्यालयाकडे पडताळणी प्रमाणपत्र मागितलं होतं जे महाविद्यालयाने दिलं नाही, त्यामुळे माझी नोकरी गेली. त्याने महाविद्यालयाच्या प्रशासनाने जातीय भेदभाव करून व्हेरिफिकेशन केले नाही,असा आरोप केला आहे, दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (NCP MLA rohit pawar) यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांच्यावर मनुवादी असा ठपका ठेवत मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही, असं म्हणत टीका केली आहे. रोहित पवार (NCP MLA rohit pawar) यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे.
Rohit Pawar Post: काय म्हणालेत रोहित पवार?
पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाने वेळेत कागदपत्रांची पडताळणी करून दिली नाही म्हणून एका युवा विद्यार्थ्याची लंडनमधील नोकरी जात असेल तर हे योग्य नाही. ज्या मानसिकतेतून मा. सरन्यायाधीश साहेबांवर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला त्याच मानसिकतेतून प्रेम बिऱ्हाडे या युवकाला छळन्याचा प्रयत्न मॉडर्न कॉलेज प्रशासन करत आहे का? महाविद्यालयाचा स्टाफ सहकार्य करणारा आहे यात कुठली शंका नाही, पण सर्व नियम कायदे, ज्येष्ठताक्रम डावलून प्राचार्य झालेल्या नव्या प्राचार्या मॅडम मनुवादी विचारांच्या आहेत यात देखील कुणाचं दुमत नाही. चांगला नावलौकिक आणि मोठा वारसा असलेल्या महाविद्यालयात असले मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही. महाविद्यालयाने त्या युवा विद्यार्थ्याला आवश्यक सहकार्य करून दिलगिरी व्यक्त करावी तसेच भविष्यात अशा चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि हे मनुवादी राजकारण थांबवावे अन्यथा कॉलेज प्रशासनाला हे परवडणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
Modern College: महाविद्यालयाने स्पष्टीकरण देताना काय म्हटलंय?
पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर प्रेम बिऱ्हाडे या विद्यार्थ्याने सर्टिफिकेट दिलं नसल्याचा आरोप केला होता. मात्र कॉलेजकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे. आम्ही सगळे सर्टिफिकेट दिले आहेत. शिवाय तिथल्या कंपनीच्या थर्ड पार्टी कंपनीकडून आलेल्या मेलमध्ये ज्या व्हरिफिकेशनच्या गोष्टी आहेत, त्या देखील दिल्या आहेत. त्याची नोकरी गेली नाहीये. नोकरी गेली असती तर थर्ड पार्टी कंपनीचा मेल पुन्हा आला नसता. थर्ड पार्टी कंपनीच्या मेलमध्ये कोणताही डेडलाइन दिली नव्हती, त्यामुळे आम्ही सगळी माहिती गोळा करुन कंपनीला दिली आहे. हे व्हरिफिकेशन फक्त थर्ड पार्टी कंपनी आणि कॉलेजच्या अंतर्गत असते आणि ते गोपनीय असल्याचं मॉडर्न कॉलेजकडून सांगण्यात आल आहे. शिवाय तो ज्या कंपनीत काम करायचं म्हणतोय ती एव्हिएशन (aviation) शी संबंधित आहे. त्यात चुकीची माहिती दिली तर कॉलेजला दोषी ठरवलं जात. त्यामुळे आणि नीट माहिती घेऊनच सगळी प्रक्रिया केली आहे अशी माहिती मॉडर्न कॉलेजचे व्हाईस प्रिंसिपल आणि सेक्रेटरी प्रोग्रेसिव्ह एजुकेशन सोसायटी प्रा. शामकांत देशमुख, यांनी दिली आहे.
Prem Birhade Accuses Modern College: काय आहे प्रकरण?
‘मॉडर्न कॉलेजने आपल्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने आपल्याला लंडनमधील कंपनीतील नोकरी गमवावी लागली आहे,’ असा दावा प्रेम बिऱ्हाडे या तरुणाने केला, त्याचा व्हिडीओ त्याने सोशल मिडीयावरती शेअर केला होता. ‘महाविद्यालयाच्या प्रशासनाने जातीय भेदभाव करून व्हेरिफिकेशन केले नाही,’ असा आरोपही या तरूणाने केला आहे. दरम्यान, कॉलेजने सर्व आरोप फेटाळले असून, विद्यार्थ्याला प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.