Pune Vilas lande :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेवर दावा ठोकला आहे. मी लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असून 2009 पासूनच माझा या मतदारसंघात जनसंपर्क असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं विलास लांडे आता विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना अडसर ठरण्याची शक्यता आहे. 2019ला लांडे यांची पूर्ण तयारी झाली होती, तेव्हा ऐनवेळी कोल्हे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेवर दावा ठोकला आहे. आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने मतदारसंघात भावी खासदार अशी फ्लेक्सबाजीदेखील केली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे यांनी 2009 मध्ये लोकसभेची निवडणूक लढली आहे. त्यांना 2019ला देखील संधी देण्यात आली होती. मात्र राजकारणापलीकडे जाऊन सिनेकलाकार अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती. ते म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांनी यांनी अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं होतं. त्यावेळी त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली. त्यानंतर पक्ष म्हणून आम्ही 2019 च्या निवडणुकीसाठी काम केलं होतं. आजच नाही तर 1992 पासून मी राजकारणात आहे. त्यामुळेच माझे भावी खासदार म्हणून फ्लेक्स लागले आहेत. 


शिरुर लोकसभा मतदार संघाची मतदारांची संख्या 23 लाखांची आहे. या भागात माझा मोठा जनसंपर्क आहे आणि म्हणूनच मी शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे, असं ते म्हणाले. पक्षाने संधी दिली तर नक्कीच ही निवडणूक लढवेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासोबतच या मतदार संघात राष्ट्रवादीचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून मैदानात अमोल कोल्हे की विलास लांडे यांच्यापैकी कोण उमेदवार असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.


विलास लांडेंची फ्लेक्सबाजी...


पुण्यातील फ्लेक्सबाजीची चर्चा राज्यभर रंगते. आता विलास लांडे यांच्या वाढदिवसांनिमित्त लावण्यात आलेल्या फ्लेक्समुळे राजकीय वर्तुळात नव्यानं चर्चेला उधाण आलं आहे. अमोल कोल्हे लोकसभा निवडणूक लढणार का? अशी चर्चा सुरु असतानाच आता विलास लांडे यांचे भावी खासदार असा उल्लेख असलेले फ्लेक्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचेच दोन उमेदवार ई्छूक असल्याने या लोकसभेसाठी उमेदवारी राष्ट्रवादीकडून कोणाला दिली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.