खडकवासला, पुणे : कचाकचा बटण दाबा, मतदान करा, या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (DCM Ajit Pawar) केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे आरोप त्यांच्यावर विरोधकांनी केल्यानंतर आता अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांनादेखील सतर्क राहण्याला सल्ला दिला आहे. कार्यकर्त्यांनो आचारसंहिता भंग होईल, असं काहीही करु नका म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्त्यांना खड्या शब्दांत समज दिली आहे. अजित पवार आज बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी आणि महायुतीच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना विविध सूचना केल्या आणि मोदींनाच निवडूण आणण्याचा निर्धार केला. 


अजित पवार म्हणाले की, खडकवासला विधानसभेच्या कार्यकर्त्यांचं काम चांगलं आहे. त्यांना प्रतिनिधीदेखील चांगला आहे. मात्र गावात किंवा कोणत्याही चौकात होर्डिंग लावताना विचार करा. निवडणुकीच्या खर्च जेवढा आहे तेवढ्याच खर्चात सगळ्या गोष्टी बसवा. त्यानंतर कोणत्याही पद्धतीने आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची नक्की कायळी घ्या आणि महत्वाचं म्हणजे कोणत्याहीरित्या गाफिल राहू नका, अशा सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. 


ते पुढे बोलताना म्हणाले की, नरेंद्र मोदींना आपल्याला तिसऱ्यांना पंतप्रधान बनवायचं आहे. त्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरु आहे. पंतप्रधान मोंदींशिवाय भारताला पर्याय नाही. त्याच्याशिवाय भारताचा विकास करणारा कोणी नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच मोठी मेहनत घेऊन मोदींना पंतप्रधान करायचं आहे. मोदी हे 29 एप्रिलला पुण्यात सभा घेणार आहेत. पुणे जिल्ह्यातील चारही मतदार संघाच्या उमेदवारांसाठी सभा घेण्यासाठी मोदी पुण्यात येणार आहे. त्यापूर्वी मोदींचा पुण्यात रोड शो होणार आहे. पुण्यातील सर परशूराम कॉलेजच्या मैदानात ही सभा होणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. 


कार्यकर्त्यांनो एकत्र मिळून काम करा!


 लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहेत. कोणत्याही पद्धतीची नाराजी न ठेवता एकत्र काम केलं तरंच मोदींना पंतप्रधान करण्यात आपण यशस्वी होऊ. कार्यकर्त्यांनी आपलं सोशल मीडिया नीट सांभाळा. त्यासोबतच भाषादेखील नीट वापरा. प्रचार करताना पाणी प्या दुसरं काही पिऊ नका, अशा शब्दांत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. 


इतर महत्वाची बातमी-


Supriya Sule Vs Jay Pawar : महावीर जयंतीच्या मिरवणुकीत आती अन् भाचा आमनसामने; जयला पाहून सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?