Pune News : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीय तरुणाला मारहाण केल्यानंतर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अट्टल गुंड गजा मारणेची आज (3 मार्च) जेलमध्ये रवानगी करण्यात आली. गजा मारणे आणि टोळीवर पुणे पोलिसांकडून मकोका लावण्यात आला आहे. आज दुपारी दोन वाजता गजानन मारणे आणि टोळीला न्यायालयात हजर करण्यात आले. 19 फेब्रुवारी रोजी मुरलीधर मोहोळांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेला टोळी प्रमुख म्हणून पोलिसांनी अटक केली होती. आज त्याची कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. गजा मारणेनं गुन्हा घडला त्या दिवशी वापरलेली फॉर्च्यूनर कार सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे.
पोलिसांनी गुंड गजा मारणेसह ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर या चौघांना अटक केली आहे. गजा मारणेचा भाचा श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार, रुपेश मारणे हे दोघे पसार आहेत. मारहाण केल्याप्रकरणी देवेंद्र पुरुषोत्तम जोग यांनी फिर्याद दिली आहे.
देवेंद्र जोगला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण
गेल्या महिन्यात 19 फेब्रुवारीला गजा मारणे 35 जणांसोबत छावा सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी यातील अनेक जण दुचाकीवर होते, तर गजा मारणे हा फॉर्च्यूनरमध्ये होता. चित्रपट पाहून परत येत असताना कोथरूडच्या भेलकेनगर चौकात देवेंद्र जोग या तरुणासोबत गजा मारणेसोबत असलेल्या सहकाऱ्यांचे भांडण झाले. यावेळी देवेंद्र जोगला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी गजा मारणे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होता. यावेळी चिथावणी देण्यासाठी गजा मारणेचा पुढाकार होता. पोलिसांनी कोर्टात ही माहिती दिली होती. पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेल्या आरोपींच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. दरम्यान, यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आठ ठिकाणचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे. त्या माध्यमातून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
फिर्यादी देवेंद्र जोग हे आयटी अभियंता असून भाजपचे कार्यकर्ते आहेत. मारहाण झाल्यावर कोथरूड पोलिसांनी सुरुवातीला मारहाणीची कलमे दाखल केली होती. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यावर त्यामध्ये आरोपींविरोधात खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यापूर्वी सुद्धा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद गजा मारणे टोळीवर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या