पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात (Mundhwa Land Scam) महत्त्वाची घडामोड घडली आहे. शीतल तेजवानी यांच्यानंतर आता अमेडिया कंपनीचे भागधारक आणि पार्थ पवार यांचे मामभाऊ दिग्विजय पाटील यांच्याविरोधातही पुणे पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र (Supplementary Chargesheet) दाखल केले आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने पुढे सरकताना दिसत आहे.
सुरुवातीला दाखल करण्यात आलेल्या मुख्य आरोपपत्रात दिग्विजय पाटील यांचे नाव नव्हते. मात्र तपासादरम्यान उपलब्ध झालेल्या दस्तऐवज आणि पुराव्यांच्या आधारे पुणे पोलिसांनी त्यांना या प्रकरणातील क्रमांक दोनचा आरोपी म्हणून समाविष्ट केलं आहे. शासकीय जमीन परस्पर खरेदी आणि संबंधित व्यवहारातील अनियमिततेबाबत त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले आहेत.
Amedia Company Role : अमेडिया कंपनीतील सहभाग
दिग्विजय पाटील हे अमेडिया कंपनीचे भागधारक आहेत. या व्यवहाराशी संबंधित दस्तऐवजांवर कंपनीच्या वतीने त्यांची स्वाक्षरी आढळल्याचं तपासात समोर आलं आहे. याच आधारे पोलिसांनी त्यांच्याविरोधातही आरोप निश्चित केले आहेत.
Who Is Digvijay Patil : कोण आहेत दिग्विजय पाटील?
दिग्विजय पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील तेर गावचे मूळ रहिवासी आहेत. ते पार्थ पवार यांचे मामा अमरसिंह पाटील यांचे पुत्र असून सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. कौटुंबिक कार्यक्रम, मतदान आणि शेतीच्या कामानिमित्त ते तेर गावाला जात असतात. सध्या त्यांच्या कुटुंबातील कोणाचेही तेरमध्ये कायम वास्तव्य नसल्याचं सांगितलं जातं.
Sheetal Tejwani Bail : शीतल तेजवानीला जामीन
या प्रकरणातील आणखी एक प्रमुख आरोपी शीतल तेजवानी यांना गेल्या महिन्यात जामीन मंजूर झाला. अटकेपूर्वीची प्रक्रिया पूर्ण करताना बावधन पोलिसांकडून त्रुटी राहिल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने त्यांना दिलासा मिळाला.
What Is Mundhwa Land Scam : नेमकं मुंढवा जमीन प्रकरण काय?
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे 40 एकर जमीन या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे. 1819 मध्ये ही जमीन महार वतन म्हणून देण्यात आली होती. नंतर 1957 मध्ये ती सरकारकडे आली आणि 1962 मध्ये भारतीय वनस्पती सर्वेक्षण केंद्रासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली. या जमिनीपैकी फक्त 3 एकरांवर केंद्राचे कामकाज होते, तर उर्वरित भाग जंगल स्वरूपात होता.
सन 2006 मध्ये वतनदारांकडून शीतल तेजवानी यांना पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आली. त्यानंतर ही जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली. सध्याच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत सुमारे 1800 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जाते. मात्र व्यवहार केवळ 300 कोटी रुपयांत झाल्याचा आरोप आहे. याशिवाय सुमारे 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आल्याने या व्यवहारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
दिग्विजय पाटील यांच्यावर पुरवणी आरोपपत्र दाखल झाल्यामुळे या प्रकरणातील तपासाचा फास आणखी घट्ट झाला आहे. पुढील काळात या व्यवहाराशी संबंधित आणखी काही मोठी नावे तपासाच्या कक्षेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही बातमी वाचा:
