पुणे: पुण्यात दिवसेंदिवस महिला अत्याचार, खून, गुन्हेगारी या घटना मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. अशातच काल (गुरूवारी) दोन चिमुकल्या मुलींवर स्कुलबस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली, या घटनेचा संताप नागरिक, पालक व्यक्त करत असतानाच शहर परिसरात पुन्हा एक सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरूणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली. पुण्यातील बोपदेव घाटातून तरूणीचे अपहरण करून तिला येवलेवाडी परीसरात घेऊन जाऊन तिच्यावर गँगरेप करण्यात आल्याचा हा भयानक प्रकार आहे. पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत नागरिकांसह आता राजकीय नेते देखील संताप व्यक्त करताना दिसत आहेत. (Pune Crime News)
सुप्रिया सुळेंची संतापजनक पोस्ट
या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संतापजनक पोस्ट लिहली आहे. सोशल मिडिया एक्सवरती सुळेंनी पोस्ट लिहून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल उपस्थित केले आहेत. पोस्टमध्ये, "अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरू आहे? बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे. शासनाने सदर घटनेतील आरोपींना गजाआड करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी", अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (Pune Crime News)
नेमकं काय आहे प्रकरण?
मित्रासोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत आधी अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिघांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी मित्रासह फिरण्यासाठी बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा तिघेजण तिथे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याच सांगून त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्यानंतर संबंधित तरूणीला कारमधे बसवून कार येवलेवाडी भागातील एका गल्लीत नेण्यात आली. तिथे या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तरुणीला खडी मशीन चौकात सोडून आरोपी नराधम पसार झाले. त्यानंतर तरुणीने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली.