MP Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंनी चक्क अजित दादांना देहूमध्ये बोलावू नका, असा सल्ला पुण्याच्या मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना दिला आहे. हे म्हणताना त्यांचा सूर हा मिश्किल होता. घडलं असं की, देहू विकास आराखड्याची पाहणी करताना कचऱ्याचं साम्राज्य खासदार सुळेंच्या नजरेस पडलं. हीच बाब भाषणावेळी त्यांनी नमूद करत नाराजी व्यक्त केली. देहूकरांनी आपल्यावर विश्वास दाखवत नगरपरिषदेत एकहाती सत्ता दिलीये, तेंव्हा स्वच्छता राखा अशी ताकीद सुप्रीया सुळे यांनी दिली. 


तुम्हाला कधी स्वच्छतेचं ऑडिट करायचं असेल तर या महाराष्ट्रात एकमेव माणूस आहे ते म्हणजे आमचे जेष्ठ बंधू अजित दादा. त्यांना एक दिवस सकाळी बोलावून घ्या, ते सुनील अण्णाची फुल परेड करून टाकतील. सुनील इथे कचरा कसा? तिथं कचरा कसा? वैतागून सुनील हात जोडेल अन म्हणेल मीच झाडू घेऊन स्वच्छता करतो बाबा.... असं सुप्रिया सुळे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यामुळं दादांना वर्षभर देहूत बोलावू नका नाहीतर सर्वांवर फायरिंग होईल. मी पण लगेच काय तुमची चाडी करणार नाही, काही महिने जाऊदेत. मी पण दोन-तीन वेळा येते, आपण स्वच्छतेसाठी कंबर कसूयात. पण त्याआधी एक काम करा. सरकार वृक्षारोपण करेलच, पण प्रत्येक कुटुंबावर एका-एका झाडाची जबाबदारी द्या. याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांपासून करा, असं आवाहन सुळेंनी यावेळी केलं. 


मोबाईल चित्रीकरणामुळं मोठी अडचण निर्माण झालीये
मोबाईल चित्रीकरणामुळं आज मोठी अडचण निर्माण झालीये, अशी कबुली स्वतः राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिली. पुण्यातील देहूत मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्यांना उद्देशून बोलताना, ह्यांच्यामुळं ईच्छा असताना देखील कुठं मनमोकळं बोलता येत नाही. अगदी घरात पण अडचण आहे, घरातील एखाद्या कामगाराने फोन सुरु ठेवला तर मी आणि सदानंद काय बोलतोय हे सुद्धा बाहेर यायचं. त्यामुळं एवढी मोठी अडचण या कॅमेऱ्यांमुळं झाल्याची कबुली सुळे यांनी दिली.