Pune Shivaj Nagar Bus Stop : मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिवाजीनगर बस स्थानक वाकडेवाडी इथून मूळ ठिकाणी शिवाजीनगर इथे स्थलांतरित करण्याबाबत लक्षवेधी सूचना आज आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांनी विधीमंडळात मांडली. यावेळी लवकरच शिवाजीनगरचे बसस्थानक उभारले जाईल असे आश्वासन सरकारकडून यावेळी दिलं. मेट्रोच्या कामामुळे शिवाजीनगर येथील एसटी स्टँड हे जुना पुणे-मुंबई हायवे वाकडेवाडी इथे 2019 पासून तीन वर्षांकरता स्थलांतरित करण्यात आला आहे. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना शिवाजीनगर एसटी बस स्थानकासाठी सुंदर इंटिग्रेटेड विकास आराखडा तयार केला होता. मात्र महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळे सर्व काम थांबवलं गेलं तसेच एसटी बस स्थानकाबाबत कोणतेही काम झाले नाही असे शिरोळे म्हणाले.
शिवाजीनगर एसटी बस स्थानकाची जागा महामेट्रोने घेताना दोन्ही विभागांमध्ये सामंजस्य करार झाला होता. या करारानुसार महामेट्रोने इंटिग्रेटेड एसटी स्टँड बांधून देण्याचे ठरले होते. त्यामध्ये भूमिगतचे दोन मजले आणि तळमजला बांधून द्यावे असा करार झाला होता. सध्या महामेट्रोचे काम पूर्ण झाले आहे पण कराराप्रमाणे बस स्थानकाचे काम सुरु झालेले नाही. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्यामुळे त्यांना पुन्हा बस स्थानक बांधणे अडचणीचे ठरणार आहे, त्यामुळे महामेट्रोने करारानुसार स्थानक बांधून द्यावे अशी मागणी शिरोळे यांनी केली. तसेच तिथे एक कमर्शिअल इमारत बांधून नॉन तिकीट रेव्हेन्यू सुद्धा प्राप्त करण्याचे आखले होते. त्याबाबत पण शासनाने कार्यवाही करावी असे आमदार शिरोळे यांनी लक्षवेधी सूचनेत मांडले. तसेच वाकडेवाडी इथे स्थलांतरित केलेल्या बसस्थानकामुळे एकता नगर, वाकडेवाडीच्या स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास होत आहे. तसेच प्रवाशांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे असे शिरोळे यांनी आपल्या सूचनेत मांडले.
बसस्थानक प्रवाशांच्या हिताचं...
जुन्या शिवाजीनगर एसटी स्टँड येथे पुन्हा एसटी बस सेवा सुरु करणे गरजेचे आहे, कारण नागरिकांना ती जागा सोयीची आहे. मेट्रो, पीएमपीएमएल आणि रेल्वे यांची स्थानके ही त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे कनेक्टिव्हिटी पाहता एसटी बस सेवा शिवाजीनगर इथल्या पूर्वीच्या बस स्थानकावरुन सुरु ठेवण्यास नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या हिताचे ठरेल. यावेळी मंत्री महोदयांनी या लक्षवेधीला सकारात्मक उत्तर दिले असून लवकरच शिवाजीनगरचे बसस्थानक उभारले जाईल असे आश्वासन मंत्र्यांनी यावेळी दिलं.
या लक्षवेधी दरम्यान मंत्र्यांना तीन प्रश्न विचारण्यात आले होते. 1) शिवाजीनगर बस स्थानक पुन्हा मूळ ठिकाणी हलवण्यात येईल का? 2) असे असल्यास त्याला किती कालावधी लागेल? 3) तत्कालीन महायुती सरकारने केलेला इंटिग्रेटेड प्लॅन आहे तो या जागी केला जाईल का? या तिन्ही प्रश्नावर मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिलं आहे.