पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये बुधवारी (ता -19) शिवजयंती दिवशी दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गज्या मारणेच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना समोर आली होती. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना वाद झाला आणि देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आत्तापर्यंत तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर अद्याप एक जण फरार आहे, फरार असलेला गुंड गज्या मारणेचा भाचा असल्याचा माहिती आहे. घटनेमध्ये मारहाण करण्यात आलेला तरुण देवेंद्र जोग भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर मुरलीधर मोहोळ यांनी या तरूणाला व्हिडिओ कॉलवरून संपर्क केला होता, त्याची विचारपुस केली होती, त्यानंतर आता मोहोळ यांनी पुण्यात आल्यानंतर देवेंद्र जोग या तरुणाची घरी जाऊन भेट घेऊन विचारपुस केल्याची माहिती समोर आली आहे. 


केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मारहाण झालेल्या देवेंद्र जोग या तरूणाची घरी जाऊन भेट घेतली. य भेटीचे फोटो आणि घटनेची माहिती त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे. "भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला मारहाणीच्या घडलेल्या प्रकारानंतर त्याच्या निवासस्थानी सपत्नीक जाऊन भेट घेतली. तीन दिवस गुजरात आणि दिल्लीमध्ये असल्याने पुण्यात पोहोचल्यावर थेट देवेंद्रच्या घरी पोहोचलो, सगळी घटना समजून घेतली", अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. 


मुरलीधर मोहोळ यांची सोशल मिडिया पोस्ट


"भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला मारहाणीच्या घडलेल्या प्रकारानंतर त्याच्या निवासस्थानी सपत्नीक जाऊन भेट घेतली. तीन दिवस गुजरात आणि दिल्लीमध्ये असल्याने पुण्यात पोहोचल्यावर थेट देवेंद्रच्या घरी पोहोचलो. देवेंद्रकडून सगळा घटनाक्रम समजून घेत त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत देवेंद्रला जबर दुखापत झाली असून आरोपींनाही अटक झाली आहे. तसेच आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही पुणे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांना दिल्या आहेत. देवेंद्र एक कर्तबगार संगणक अभियंता असून अतिशय मितभाषी आणि शांत स्वभावाचा तरुण आहे. कोणाच्याही हकनाक वाट्याला न जाणाऱ्या देवेंद्रसारख्या तरुणाला मारहाण होते, हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही. आज देवेंद्रच्या बाबतीत असा प्रकार घडला उद्या कोणत्याही तरुणाच्या बाबतीत होऊ शकतो. त्यामुळे योग्य ती पावले उचलण्याबाबतही पोलीस आयुक्तांना सूचना केल्या आहेत", अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या सोशल मिडियावरून दिली आहे.






नेमकं प्रकरण काय?


कोथरूड परिसरात गाडीचा धक्का लागल्याने जाब विचारल्यामुळे एका तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.19 फेब्रुवारी रोजी कोथरूड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती, त्यावेळी मिरवणुकीच्या दरम्यान चार जणांनी बाईकवरून जाणाऱ्या देवेंद्र जोग यांना कट मारला. देवेंद्र जोग यांच्याशी त्या चार जणांची वादविवाद झाला आणि त्यामुळे ते चौघे मिळून देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी चौघांविरुद्ध गंभीर कलम 307 (खून करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोथरूड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, तर चौथा आरोपी बाबू पवार फरार आहे. बाबू पवार हा कुख्यात गुंड गजानन मारणेचा भाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपी म्हणून अमोल विनायक तापकीर, ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू, किरण कोंडीबा पडवळ, आणि बाबू पवार यांचे नावे समोर आले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.