पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटील (Sasoon Hospital Drug Racket) पळून जाण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची भेट घेऊन ललित पाटील याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती मागितली. मात्र, डीननी ही माहिती देण्यास नकार दिल्याने आमदार रवींद्र धंगेकर यांनी डीनच्या केबिनमध्येच ठिय्या मांडला. डीननी माहिती न दिल्याने आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससूनच्या कारभाराबाबत सुनावले. ललित पाटीलवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
ललित पाटील फरार होऊन नऊ दिवस झाल्यानंतर देखील त्याच्यावर कुठल्या आजारासाठी उपचार सुरु होते आणि त्याच्यावर कोण डॉक्टर उपचार करत होते? हे ससुनकडून जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे ससूनच्या कारभारावर चांगलीच टीका केली जात आहे.
धंगेकरांनी धरलं डीनला धारेवर....
कसबा मतदारसंघातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. धंगेकरांनी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी आमदार धंगेकर यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना ठाकूर यांची चांगलीच तारांबळ उडाली. धंगेकर यांनी ससूनचा कारभार असाच सुरु राहिला तर मग मात्र मला वाकड्यात शिरावे लागेल अशा शब्दात खडे बोल सुनावले. ससून रुग्णालयातून ड्रग तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील पळून गेल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर पुणे पोलीसांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
ललितचा भाऊ भूषण पाटीलसह साथीदारास अयोध्येतून अटक...
ससून रुग्णालयातील ड्रग्स रॅकेट प्रकरणी पळून गेलेल्या ललित पाटीलच्या भावाला आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे अशी या दोघांनी नावं आहे. दोघांनाही उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळाल्यावर भूषण पाटीलही फरार होता. त्याला शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र ललित पाटील अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील केमिकल इंजिनिअर आहे. हा भूषण मेफेड्रोन ड्रग्स तयार करायचा आणि अभिषेक बलकवडे या मेफेड्रोन ड्रग्सची वाहतूक करत होता. योग्य स्थळी नेऊन पोहचवत होता. त्यानंतर ललित पाटील या मेफेड्रोन ड्रग्सची डिल करत होता. या तिघांची साखळी अनेकांपर्यंत मेफेड्रोन पोहोचवत होती.
इतर महत्वाची बातमी-