पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 4186 सदनिकांच्या विक्रीकरिता अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. म्हाडानं या सोडतीसाठी वारंवार मुदतवाढ दिल्यानं 2 लाख 15 हजार अर्ज दाखल झाले आहेत. 20 नोव्हेंबरला मुदता वाढ दिली होती त्यावेळी 11 डिसेंबरला सोडत काढली जाईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र, मोठ्या संख्येनं अर्ज या लॉटरीसाठी आल्यानं म्हाडाचा वेळ पडताळणीत गेला आणि ही सोडत निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहे.
Mhada Pune Lottery : अर्जदार हवालदिल
म्हाडाच्या नियोजनाप्रमाणं 26 डिसेंबरला पात्र अर्जदारांची यादी जाहीर केली जाणार आहे. मात्र, म्हाडाची सोडत मात्र लांबणीवर पडली आहे. 11 सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात या सोडतीसाठी झालेली आहे. म्हणजेच आतापर्यंत अर्जदारांची अनामत रक्कम तीन महिन्यांहून अधिक काळ जमा आहे. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानं त्याची आचारसंहिता लागू झालेली आहे. याशिवाय त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागेल. त्यामुळं म्हाडाकडून या घरांसाठीची सोडत फेब्रुवारी महिन्यात काढली जाण्याची शक्यता आहे. म्हाडानं अर्जाचं शुल्क म्हणून 718 रुपये अर्जदारांकडून घेतले आहेत. 2 लाख 15 हजार अर्जदारांची एकूण अनामत रक्कम जवळपास 446 कोटी रुपये होते. अनेक सामान्य नागरिकांनी ही रक्कम क्रेडिट कार्डवरून,उसने पैसे घेऊन, तर काहींनी आपल्या बचतीतून भरली आहे. आज जवळजवळ 3 महिने 14 दिवस उलटून गेले, तरीही लॉटरी ड्रॉची तारीख स्पष्ट नसल्यानं अर्जदार हवालदिल झाले आहेत.
म्हाडाकडून पुणे मंडळाच्या घरांची सोडत कधी काढली जाणार याबाबत ठोस माहिती मिळत नसल्याचं मत काही अर्जदारांनी व्यक्त केलं आहे. अर्जदारांची अनामत रक्कम म्हणून म्हाडाकडे जमा झालेल्या 446 कोटी रुपयांच्या व्याजाचं काय असा सवाल देखील काही अर्जदारांनी केला आहे.
पुणे म्हाडाकडून 4168 घरांसाठी सोडत
पुणे मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत चार घटकांमध्ये विभागलेली आहे. म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 1683 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 299 सदनिका, 15 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील 864 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण 3222 सदनिकांचा समावेश आहे.
