पुणे : पुण्यात मनोज जरांगेंना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर सरकारी पातळीवरून आता पळापळ सुरु झाली आहे. पुण्यात यात्रा पोहोचल्यापासून पदयात्रेला मिळालेल्या प्रतिसादाने वाहतुकीवर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून पदयात्रेचा मार्ग बदलण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना विनंती करण्यात आली. मात्र, त्यांनी आपल्याला पुण्याची काहीच माहिती नसल्याचे सांगितले. दुसरीकडे, सरकारी पातळीवरून सुद्धा पळापळ सुरु झाली आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड हे पुण्याकडे रवाना झाले आहेत. मुंबईतून सुद्धा एक प्रतिनिधी पुण्याकडे रवाना झाले आहेत. आजच ही भेट होण्याची शक्यता आहे.
पुण्यात अभूतपूर्व स्वागत
दरम्यान, आज मध्यरात्री मनोज जरांगे यांची पदयात्रा मध्यऱात्री पुण्यात पोहोचल्यानंतर अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. रात्रभर पुण्यात कडाक्याची थंडी असतानाही हजारोंच्या संख्येनं गर्दी केली होती. पहाटेच सभा पार पडली. पहाटेच्या सभेनंतर सकाळी वाघोलीपासून मोर्चाला सुरुवात झाली आहे. हातात झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या, एका मराठा लाख मराठाच्या पताका, टाळ - मृदंगाचा गजर करत नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. प्रमुख रस्त्यावरून मोर्चा जात असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
खराडीपासून मोर्चा ज्याप्रमाणे पुढे जाईल. तशी वाहतूक सुरळीत केली जात आहे. शिवाजीनगर-संचेती हॉस्पिटल परिसरात 100 किलोचा हार अर्पण करून तसेच फुलांची उधळण करून मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात येणार आहे. मोर्चात पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसून येत आहे. तसेच बांधवांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे.
पदयात्रेचा मार्ग आहे तरी कसा?
पदयात्रेचा मार्ग शहरातून जात असल्याने पुणे,पिंपरी चिंचवड शहरातील मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. खराडी येथून सुरु झालेली पदयात्रा नगर रोडने महालक्ष्मी लॉन्स ते जहाँगिर हॉस्पिटल ते संचेती हॉस्पिटल व तेथून शिवाजीनगर कृषी महाविद्यालय समोरील चाफेकर चौकातून गणेश खिंड रोडने विद्यापीठ चौकात जाईल. तेथून औंध मार्ग राजीव गांधी पूलमार्गे पुणे मुंबई महामार्गाने लोणावळा मुक्कामी जाणार आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरात वाहतूक अन्य मार्गावर वळविण्यात आली आहे. नगर रोडवरून येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. पदयात्रा जसजशी पुढे जाईल त्यानुसार वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या