पुणे: बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केलं, त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली, यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. बीड, परभणी नंतर आज पुण्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांसोबतच संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील उपस्थित होते. या मोर्चासाठी मनोज जरांगे देखील उपस्थित होते, मात्र, मनोज जरांगे पाटील यांना मोर्चातून माघारी आपल्या गावी जावे लागले. त्याचं कारणही समोर आलं आहे.
नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील यांच्या चुलत भावाचे अपघाती निधन झाल्याने त्यांना पुण्यातून पुन्हा आपल्या गावी जावं लागलं आहे, चुलत भावाच्या अंत्यविधीला जाण्यासाठी जरांगे पाटील पुण्यातून निघाले असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे जरांगे पाटील हे आजच्या जनआक्रोश मोर्चाच्या मंचावर दिसून आले नाहीत.
दरम्यान सुरेश धस यांनी मोर्चासाठी जमलेल्यांना संबोधित करताना त्याबाबतची माहिती दिली आहे. बोलताना सुरेश धस म्हणाले, आता मनोज दादांच्या कुटुंबातील त्यांचा चुलत भावाचं निधन झालं असल्यामुळे ते इथे येऊन परत गेलेत.साडेपाच वाजता ते त्यांच्या मातोरी या गावावरून निघाले होते इथपर्यंत आले, परंतु दुर्दैवी घटना घडल्यामुळे ते परत गेले आणि पृथ्वीराज देशमुख यांचाही फोन इथे आल्यावर आला होता, की मोर्चाच्या शुभारंभ करून द्यायला मी होतो. मात्र, पुढे वेळ झाल्यामुळे पुढचं काम असल्यामुळे ते गेले अशी माहिती यावेळी बोलताना सुरेश धस यांनी दिली आहे.