Vaishnavi Hagawane Case: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशभरात चर्चेत आलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाचा अहवाल आता समोर आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील बहुचर्चित वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagawane Case) प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग असण्याची व कस्पटे कुटुंबीयांनी त्याबाबत आरोप केल्यानंतर पोलिसांनी या दिशेने स्वतःहून तपास करून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांच्या स्तरावरून अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. ही बाब अत्यंत खेदजनक, गंभीर व आक्षेपार्ह असल्याचे विधिमंडळाच्या महिला बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने आपल्या अहवालात म्हटलं आहे.(Vaishnavi Hagawane Case)
दरम्यान, आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचा अहवाल शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला होता. अहवालात म्हटले आहे की, हगवणे कुटूंबाचे नातेवाईक असलेले आयजी सुपेकर आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करावी आणि त्याची माहिती समितीला द्यावी, असे स्पष्ट निर्देश समितीने गृह विभागाला दिलेले होते. मात्र, हा अहवाल विधानसभेत सादर होईपर्यंत कोणतीही माहिती समितीला दिली गेली नाही. हा समितीचा अवमान आहे. याची गृह विभागाने गंभीर दखल घ्यावी आणि अशा दिरंगाईसाठी दोषी असलेल्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करावी, जालिंदर सुपेकर यांची एक ऑडिओ क्लिप माध्यमांमध्ये आलेली होती. या क्लिपची तपासणी करावी. सुपेकर यांच्या पत्नीच्या खात्यात रुखवताच्या निमित्ताने हुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचे दिसून येत असल्यामुळे त्या दृष्टीने तपास करून सुपेकर यांच्या पत्नीला या प्रकरणात सहआरोपी करावे, असेही नमूद करण्यात आले आहे.
अहवालात नेमकं काय-काय म्हटलंय?
या प्रकरणी हगवणे कुटुंबियांचे निकटवर्तीय असलेले पुण्यातील तत्कालीन आय.जी.जालींदर सुपेकर यांचा सहभाग व हस्तक्षेप देखील तपासादरम्यान समोर आला आहे. इतकेच नव्हेतर वैष्णवी हगवणेच्या लग्नात रुखवताच्या नावाखाली सुपेकर यांच्या पत्नीच्या बँक खात्यात एक लाख रुपये तसेच रोखीने पन्नास हजार असे एकूण दीड लाख रुपये ट्रान्सफर केल्याचे पुरावे देखील विभागाकडे प्राप्त झालेले आहेत. तसेच कस्पटे कुटुंबियांनी देखील ही बाब पोलीस जबाबात नोंदविलेली असून प्रसार माध्यमांसमोर देखील सांगितलेली आहे. इतकेच नव्हेतर कस्पटे (वैष्णवीचे आई-वडील) कुटुंबियांनी या प्रकरणात आयजी सुपेकर यांनी पदाचा गैरवापर करून त्या माध्यमातून सदर प्रकरणी दबाव आणून आरोपींना मदत करण्यात येत असल्याचे स्टेटमेंट पोलिसांना दिलेले आहे.
हगवणे कुटुंबातील निकटवर्तीय पोलीस विभागात वरिष्ठ पदांवर कार्यरत असल्यामुळे या प्रकरणाच्या तपासावर त्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होण्याची पूर्ण शक्यता लक्षात घेता, या प्रकरणाच्या तपासापासून अशा सर्व व्यक्तींना दूर ठेवण्यात यावे. तसेच त्यांच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव, दबाव व हस्तक्षेप या तपासावर होणार नाही याची पुर्ण दक्षता विभागाने घ्यावी. सुपेकर हे पदाचा गैरवापर करून या प्रकरणी दबाव आणण्याची पुर्ण शक्यता आहे. त्याआधारे त्यांचा या प्रकरणातील सहभागाबाबत सखोल तपास करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे त्यादरम्यान जालिंदर सुपेकर यांची एक ऑडीओ क्लीप माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आली. या ऑडीओ क्लीपची फॉरेन्सीक विभागाकडून सखोल तपासणी करून याची सत्यता पडताळून पहावी.
यात वस्तुस्थिती आढळल्यास जालिंदर सुपेकर यांना निलंबित करून त्यांचेवर गुन्हा दाखल करून त्यांना या प्रकरणी सहआरोपी करण्यात यावे. तसेच जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीच्या खात्यात रुखवताच्या निमित्ताने हुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचे दिसून येत असल्यामुळे त्यादृष्टीने तपास करून जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीला या प्रकरणात सहआरोपी करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व यासंदर्भात केलेल्या कारवाईची माहिती समितीस तात्काळ देण्यात यावी अशीही समितीची शिफारस आहे.