पुणे:महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला असला तरी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी काही संपण्याचं नाव घेत नाहीत. अजित पवारांनी भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर लांडगेंनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्राच्या दादाला गल्लीबोळात फिरायला लागतंय असा टोला त्यांनी लगावला. तसेच धरणात पाणी नाही म्हटल्यावर अजित पवार शेतकऱ्यांना काय म्हटले होते? आम्ही लोकांना तसं कधीच म्हटलं नाही असं सांगत लांडगेंनी दादांच्या जुन्या जखमेची खपली काढली.

अजित पवारांनी योग्यवेळी पालकत्व स्वीकारलं असतं तर आज उत्तरदायित्व मागायची वेळ आली नसती. तुम्ही काहीही आरोप कराल आणि आम्ही सहन करणार असं होणार नाही. त्यांनी वैयक्तिक टीका का केली ते मला कळत नाही. राजकारण करत असताना अनेक लोक सरेंडर होतात, पण मी स्वाभिमानी आहे. मी जेव्हापासून त्यांना सोडलं तेव्हापासून त्यांच्याकडे एकही काम घेऊन गेलो नाही असं महेश लांडगे म्हणाले.

मी आमच्या लोकांच्या समस्या ओळखतो. काल काही लोकांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आम्ही पाणी आणलं, पाइपलाईन केली. पण पवना जलवाहिनी का बंद झाली याबाबत का चौकशी केली नाही?

याच महाराष्ट्राच्या दादांनी शेतकऱ्यांना त्यावेळी उत्तर दिलं होतं की धरणात पाणी नाही तर काय करू? आम्ही कधी असं लोकांना म्हटलं नाही की धरणात पाणी नाही तर आम्ही काय करू? पाण्यासाठी आम्ही शहरात सगळी कामं केली आहेत. आम्ही 5 वर्षात काय केलं हेच सांगत आहोत असं म्हणत महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्या जाहीरनाम्यावर टीका केली.

कामाच्या आधारे मतं मागतोय

महेश लांडगे म्हणाले की, "आमच्या जाहिरनाम्याबद्दल दिशाभूल करण्याचे काम विरोधक करत आहेत. आमची आश्वासनं पूर्ण करणं शक्य नाही, ती अवास्तव आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण आमची आश्वासनं व्यवहार्य आहेत. आम्ही घेतलेले निर्णय घाईने घेतलेले नाहीत. आम्ही लोकांमधे जाऊन सर्वेक्षण केलंय, लोकांची मतं जाणून घेतली आहेत आणि मगच हा निर्णय घेतला आहे."

आपली महापालिका ही पूर्ण राज्यात चर्चेची झाली, ही चर्चा का झाली, कुणामुळं झाली सगळ्यांना माहिती आहे. 2017 मध्ये बहुमताने भाजप निवडून आली. त्यानंतर आपल्या शहराला गती देण्याचं काम आम्ही केलं. देवेंद्र फडणवीस याचं मार्गदर्शन आम्हाला होतं. राज्यातल्या सगळ्या नेत्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. राज्य सरकारच्या योजना आम्ही पूर्णपणे शहरात राबविल्या. याच आधारावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत असं महेश लांडगे म्हणाले.

महाराष्ट्राच्या दादाला गल्लीबोळात फिरावं लागतंय

अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर महेश लांडगे म्हणाले की, "निवडणुकीत आरोप होत असतात, मी कुठल्याही निवडणुकीत कुणावर आरोप केले नाहीत अथवा उत्तर दिलं नाही. मी जनसेवेची कामं केली, लोकांनी ते स्वीकारलं. कुणाची बदनामी न करता जर कुणी पुढं जात असेल तर लोक त्यांना विरोध करतात. पण मला बदनाम केलं जात आहे. ही सगळी चर्चा फक्त पिंपरी चिंचवडमध्ये मर्यादित नाही, महाराष्ट्राचा दादा आणि गल्लीबोळातला दादा अशी लढाई त्यांनी निर्माण केली."

आरोपांवर पुरावे नाहीत

मी परत सांगतो कुठलाही आरोप करताना त्याला पुरावा असावा लागतो. अजित पवारांनी आरोप केलेत पण त्यांच्याकडे पुरावा नाही. मी पण आरोप करू शकतो. माझ्यावर काहीही आरोप करू द्या, मी लक्ष देत नाहीत. निवडणूक आली की आरोप होतात असं महेश लांडगे म्हणाले.

अजित पवार स्वार्थी राजकारणी

लोकसभेत आढळराव पाटील घड्याळाच्या चिन्हावर उभे होते. त्यावेळेस महेश लांडगे यांचे गुणगान त्यांनी गायले. म्हणजे तुमचं काम असले की महेश लांडगे चांगला, नाहीतर वाईट. परत ही जागा लोकसभेला त्यांना गेली तर परत माझ्याकडे येतील आणि महेश चांगला आहे असं म्हणतील. अजित पवार स्वार्थी राजकारणी आहेत असा आरोप लांडगे यांनी केला.

महेश लांडगे म्हणाले की, "काय बोलाव आता महाराष्ट्राच्या दादाला? 100, 200 लोकांमध्ये सभा घ्यायला लागले आहेत, हे म्हणजे महाराष्ट्राच्या दादासाठी, त्यांच्या प्रतिष्ठेसाठी चांगल नाही असा टोला महेश लांडगे यांनी लगावला. माझ्या भावावर त्यांनी टीका केली, मग पार्थ पवार ऐवजी स्वार्थ पवार म्हणावं का? 1800 कोटी रुपयांचे आरोप तुमच्या मुलावर झाले आणि वडील म्हणतात की मला माहिती नाही. खालच्या दर्जाला जाऊन आरोप करणं हे महाराष्ट्राच्या दादाला शोभत नाही."

राजकारणाच्या मर्यादा सांभाळण्याचं काम मीच ठरवलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचाच महापौर होणार, आमचं बहुमत येणार. माझी मान मजबूत आहे, त्यामुळे बुद्धी आणि शक्ती पैलवानकडे असते. पुढचा माणूस काय डाव टाकणार आहे आणि त्याला कसं चित्रपट करायचं हे आमच्या रक्तात असतं. राजकीय डावपेच करतात म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली आहे. गल्लोगल्लीत त्यांना सभा घ्यावी लागली. ही परिस्थिती त्यांच्यावर कशामुळे आली हे त्यांचं आत्मचिंतन करावंअसं म्हणत महेश लांडगे यांनी अजित पवारांना टोला लगावला.

ही बातमी वाचा: