पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये जोरदार पाऊस (heavy Rain) सुरू आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तर मुसळधार पावसाने  (heavy Rain) हजेरी लावली आहे. दरम्यान आज पहाटेपासून पुणे, रायगड या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसामध्ये पुणे शहर परिसरात रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र आज पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळला. तर मध्यरात्री आणि पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने (heavy Rain) रायगड जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. वेगवान वाऱ्यासह लागलेल्या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, पेण, माणगाव, रोहा तालुक्याला देखील रात्री चांगलंच झोडपलं. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावरील सखल भागात पाणीच पाणी साचले आहे. रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (heavy Rain) 

Continues below advertisement

कोकण तसेच विदर्भात पुढील पाच दिवस मुसळधार

राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यापासून अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस कोकण, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यानंतर पावसाने जोर वाढला आहे. कोकणात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्या तुलनेत विदर्भात फारसा पाऊस पडलेला नाही. पुढील पाच दिवस कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील दोन तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर ओसरला आहे. अधूनमधून हलक्या सरी बरसतात. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 6 मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात 6 मिमी पावसाची नोंद झाली. नंदुरबार जिल्ह्यातमध्ये दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर डोंगराळ भागात पहाटेपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सातपुडा परिसरात पावसाला सुरवात झाली आहे. सुरू असलेल्यापावसामुळे लहान नद्यांना पूर आल्याचंही दिसून येत आहे. 

सिंधुदुर्गमध्ये एक जण गेला वाहून

सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळत आल्याने कर्ली नदीवर असलेल्या सकल पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकीस्वार पाण्यात वाहुन गेल्याची घटना घडली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्यातील वसोली गावातील कर्ली नदीवरील कुत्रेकोंड पुलावरून दुचाकीस्वार वाहुन गेला तर त्यांच्यासोबत असलेला सहकारी सुदैवाने बचावला. माणगांव येथून दुचाकीने दोन युवक शिवापूरला जात होते. या दरम्यान दुचाकी वसोली कुत्रेकोंड येथे आली असता त्यांनी पुलावरील पाण्याचा अंदाज न घेता पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला.पुलावरील पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे दुचाकीसोबत एक तरूण पाण्याच्या प्रवाहाने खाली वाहत गेला तर त्याच्यासोबत सहकारी सुदैवाने बचावला. त्याने घटनास्थळी आरडाओरड केली मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे त्याला कोणीच प्रतिसाद दिला नाही. ग्रामस्थांनी शोधाशोध केली, मात्र सापडला नाही.

Continues below advertisement