Pune Baramati News: महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी शाईफेक करण्यात आली. पिंपरीत ही घटना घडली. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याव्यतिरिक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर जो कोणी शाईफेक करेल त्याला 51 हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाईल, अशी घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर बारामतीत (Baramati) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात झुंडशाही सुरु असून, हिंमत असेल तर समोर या, असं आव्हान काल (शनिवारी) चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना केलं होतं. 


पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जो कोणी शाईफेक करेल त्याला 51 हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाईल, असं चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्यव्यानंतर बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे राष्ट्रवादीचे सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड आणि इतर कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. मोर्चा काढत जो कोणी चंद्रकांत पाटील यांना काळं फासण्याचं काम करेल, त्याला 51 हजार रूपयांचं बक्षीस दिलं जाईल, असं चिथावणीखोर भाषणही केलं होतं. हे भाषण सोशल मिडीयावर व्हायरल झालं होतं. चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्यानंतरही हे बक्षीस लवकरच मनोज घरबडेला दिलं जाईल हा  व्हिडीओ देखील या कार्यकर्त्यांकडून व्हायरल करण्यात आला होता. ऋषिकेश गायकवाड यांच्यासह मनोज घरबडे यांच्यासह अन्य 13 जणांच्या विरोधात बारामती भाजप शहराध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी तक्रार दिली होती. त्यावरून बारामती शहर पोलीस स्टेशननं 15 जणांवर रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे. 


चंद्रकांत पाटलांवरील शाईफेक प्रकरणी तिघांना अटक 


महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काल (शनिवारी) पिंपरीमध्ये शाईफेक करण्यात आली. शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घटनास्थळावरुनच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांमध्ये मनोज घरबडे आणि त्याच्या दोन साथीदारांचा समावेश होता. विजय ओव्हाळ आणि धनंजय ईचगज यांचाही शाईफेक करण्यात सहभाग होता. या तिघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. 


प्रकरण नेमकं काय? 


राज्यात वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही केल्या थांबत नाही. भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा फुले आणि आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या राज्यात घमासान सुरू आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी चंद्रकात पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चंद्रकात पाटलांच्या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. दरम्यान, सत्ता गेली त्यामुळे सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान असल्याचं सांगत चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


शाईफेक प्रकरण : चंद्रकांत पाटील यांच्या विनंतीनंतरही 11 पोलिसांचं निलंबन