Prashant jagtap : राज्यात महानगरपालिकांचं बिगुल वाजलं आणि राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला, पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येऊन लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या, अशातच दोन्ही पक्ष एकत्रित येत असल्याने विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पुणे महानगरपालिकेच्या समोर प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा दिला. आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे त्यांनी आभार मानले आहेत. या पत्रकार परिषदेवेळी जगताप भावूक झाल्याचेही दिसून आले, त्यानंतर आज प्रशांत जगताप (Prashant Jagtap) काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे, तर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे यांचा पक्ष देखील जगतापांना संपर्क साधत असल्याचं दिसून येत आहे. मात्र दोन दिवसांपूर्वीच मी काँग्रेस विचारांचा आहे, त्यामुळे मी तुमच्याकडे येऊ शकत नाही, असं जगतापांनी आधीच स्पष्ट केलं असल्याचं दिसून आलं आहे.(Prashant Jagtap)
प्रशांत जगतापांचा कॉंग्रेस प्रवेश निश्चित मानला जातोय. कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून जगतापांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील देण्यात आल्यानंतर जगतापांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जातोय. प्रशांत जगतापांना शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाकडूंन देखील ऑफर देण्यात आल्या. मात्र कॉंग्रेसमधे प्रवेश नक्की मानला जातोय.
Who is Prashant jagtap: कोण आहेत प्रशांत जगताप?
प्रशांत जगताप यांनी १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कामाला सुरुवात केली. पुणे महानगरपालिकेत प्रदीर्घ काळ नगरसेवक म्हणून काम केले असून, ते वानवडी प्रभागातून निवडून येत आहेत. २०१६-१७ या कालावधीत त्यांनी पुणे शहराचे महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. २०२१ मध्ये त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. २०२३ मध्ये पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून निवडणूक लढवली होती.प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर पदी राहिलेले आहेत.शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळख आहे.शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून प्रशांत जगताप यांची पुण्यात ओळख आहे.२०२४ विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांकडून लढवली होती.सलग तीन वेळा वानवडी परिसरातून नगरसेवक राहिले आहेत.२००७,२०१२ आणि २०१७ या तिन्ही महापालिका निवडणुकीत प्रशांत जगताप निवडून आले.महापालिकेत महापौर,पीएमपीएल संचालक,पक्ष वेगळे झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करत होते.प्रशांत जगताप आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे साहजिकच काँग्रेसची ताकद पुण्यात वाढणार आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रशांत जगताप यांचा चांगला संपर्क आहे. त्याच परिसरातून काँग्रेसला ताकद मिळून नगरसेवक पद वाढण्याची शक्यता आहे. शहरात सध्याची काँग्रेसची परिस्थिती पाहता प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये गेल्याने एक चांगला नेता मिळेलच, सोबत काँग्रेसची ताकद ही वाढेल.प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये गेल्याने हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला याचा फटका बसणार आहे. काँग्रेसमधील अनेक जण नाराज असल्याचेही चर्चा आता समोर आले आहेत.दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला प्रशांत जगताप यांनी पक्ष सोडल्याने मोठा फटका बसला आहे.प्रशांत जगताप यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे एकमेव ताकतीचा नेता होता. प्रशांत जगताप यांच्यासारखा कोणीही नेता सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे नाही.पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद प्रशांत जगताप गेल्याने कमी झाल्याची चर्चा आहे. त्याचा फटका आता महापालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
Prashant Jagtap news: एकनाथ शिंदेंचा जगतापांना फोन...
एकनाथ शिंदे यांनी प्रशांत जगताप यांना काही वेळापूर्वीच फोन केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रशांत जगताप यांनी शिंदेशी बोलणे टाळले असल्याचं समोर आलं आहे. शिवसेना पक्षात येण्याची एकनाथ शिंदे यांची प्रशांत जगताप यांना ऑफर होती का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, त्याचबरोबर उध्दव ठाकरे यांची शिवसेना देखील प्रशांत जगताप यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय मात्र, जगताप हे काँग्रेसच्या विचारधारेचे असल्याने ते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील अशी शक्यता आहे.
Prashant Jagtap news: प्रशांत जगतापांना ठाकरेंची देखील ऑफर दिली, नेमकं काय घडलं?
पक्षप्रवेशाबाबत एबीपी माझाशी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, मी उद्धव ठाकरे आणि सचिन आहिर यांचे आभार मानतो. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याशी बोलायला त्यांनी वेळ दिला. या राज्यातील आक्रमक चेहरा आणि भाजपशी दोन हात करण्याची तयारी असलेला नेता माझ्याशी फोनवर बोलला. त्यांनी माझ्या भावना समजवून घेतल्या. तुम्ही आमच्या पक्षात काम करु शकता, असे त्यांनी सांगितले. मी भाजप किंवा महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये कुठेही जाणार नाही. आज मी माझ्या राजकीय जीवनाचा योग्य तो निर्णय घेईन. पण मी उद्धव साहेबांचा कायम ऋणी राहीन. त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची योग्यता समजून घेतली. पण पुढील दोन-तीन तासांमध्ये माझा निर्णय होईल.
माझी लढाई ही संविधानासाठी आणि पुरोगामी चळवळीसाठी आहे. ती कुठल्याही एखादा नेता आणि पक्षाच्या विरोधातील आहे. त्यामुळे आज जे भाजप सरकारला आव्हान देऊ शकतात, महायुती सरकारला आव्हान देऊ शकता, अशा पक्षाची निवड मी करेन.
पुढील दोन तीन तासांमध्ये मी निर्णय घेईन. भाजपचा कडवा विरोधक म्हणून उद्धव साहेबांची ओळख राज्यात आणि देशात आहे. कारण त्यांचा पक्ष, त्यांचे चिन्ह, त्यांनी तयार केलेले कार्यकर्ते भाजपने ज्या पद्धतीने पळवले आणि त्यांच्याच विरोधात उभे केले, अशा परिस्थितीत खचून न जाता तडजोड न करता उद्धव ठाकरे ज्याप्रकारे लढत आहेत, ही उल्लेखनीय बाब आहे. त्यांच्याकडे इतका जनमताचा रेटा आहे त्या नेत्याने माझ्यासारख्याशी फोनवर साडेनऊ मिनिटांची वेळ देणे, ही माझ्या आयुष्यातील कायमस्वरुपी आठवण आहे. मी लहान कार्यकर्ता आहे. पुण्याच्या भल्यासाठी तुम्ही आमच्यासोबत काम करु शकता, असे उद्धव साहेबांनी सांगितले. ही माझ्यासाठी गोष्ट आहे.