पुणे : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने नागपुरातून सुरू केलेल्या मंडल यात्रेवर लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. शरद पवार मडलं आयोगाबाबत अर्धसत्य सांगत आहेत. शरद पवारांना मंडल यात्रा काढण्याचा अधिकार कुणी दिला? असा प्रश्न त्यांनी विचारला. शरद पवार यांना ओबीसी मतांची वाणवा जाणवली म्हणून आज मंडल यात्रा काढली असा आरोपही त्यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी समाजाचे पालकत्व घ्यावं, ओबीसींच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आमची ताकद दाखवून देऊन असंही हाके म्हणाले.
शरद पवारांचा आणि ओबीसींचा संबंध काय?
लक्ष्मण हाके म्हणाले की, "महाराष्ट्रात पंचायत राज्य निवडणुका लागल्या आहेत. ज्या दिवशी या निवडणुका होणार असे कळले तेव्हापासून अनेक नेते बाहेर येऊ लागलेत. आज नागपूरमधून मंडल आयोग यात्रा सुरू झाली. आज एका नेत्याचा ओबीसींबद्दल कंठ दाटून आला. त्यांचा आणि ओबीसींचा काहीही संबंध नाही. आज ज्या नेत्यांनी मंडल यात्रा काढली ती कशाकरता काढली, त्याचा उद्देश काय हे स्पष्ट करावं."
निवडणूक समोर आल्या की यांना ओबीसींची कणव येते. ओबीसी आरक्षण हे भटक्या विमुक्त इतर लोकांसाठी आहे हे मनोज जरांगे यांना समजून सांगावे. पवारांनी राजसत्ता कुटुंबाबाहेर जाऊ दिली नाही, त्यांना मंडल आयोग का हवा आहे? असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी विचारला.
भाजपचा डीएनए ओबीसी आहे हे दाखवावं
लक्ष्मण हाके म्हणाले की, "भाजपने ओबीसींकडे दुर्लक्ष केले आहे, महज्योतीला निधी दिला नाही. ओबीसी महामंडळाला अध्यक्ष दिला नाही मग त्या पक्षाचा डीएनए हा ओबीसी कसा असेल? मुख्यमंत्र्यांनी ओबीसींची फसवणूक केली. ते ओबीसी डीएनए आहे असं म्हणतात, तसं त्यांनी दाखवावं. ओबीसी आमदारांना माझे सांगणे आहे की निधीसाठी भांडा."
राहुल गांधी यांनी ओबीसींकडे दुर्लक्ष झाल्याचे कबुल केले. जोपर्यंत राज्यातील काँग्रेस ही वतनदारांकडून काढून सामान्य लोकाच्या हातात देणार नाही तोवर महाराष्ट्र तुम्हाला काही देणार नाही.
आजकाल उठसुठ कुणीही ओबीसींची बाजू घेतात
लक्ष्मण हाके म्हणाले की, "भाजप, काँग्रेस आणि शरद पवार यांना माझं सांगणं आहे, ते कधीही गावगाड्यातील लोकांना समजून घेत नाहीत. ओबीसींनी पवारांकडून कधीही काही मागितले नाही. आज गावातला ओबीसी देशोधडीला लागला आहे. आज सगळ्यांना कंठ दाटून आला आहे. आज उठसूट सगळे ओबीसी बाजूने उभा राहत आहेत. वेळ पडली तर आम्ही ओबीसी संघर्ष यात्रा काढू, यात सर्वसामान्य ओबीसी माणूस असेल."
ही बातमी वाचा :