पुणे : खेड तालुक्यातील घोटवडी गावाजवळ रविवारी (15 फेब्रुवारी 2026) दुपारी हृदयद्रावक घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या 10 वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. कैवल्य एकनाथ भोते (वय 10, रा. वाशेरे भोतेवाडी, ता. खेड) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कैवल्य हा आपल्या वडील आणि भावासोबत पोहण्यासाठी गेला होता. जलजीवन मिशन अंतर्गत खोदलेल्या विहिरीत ते पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने कैवल्यचा तोल गेला आणि तो खोल पाण्यात बुडाला. संबंधित विहीर सुमारे 40 ते 50 फूट खोल असल्याने शोधकार्य अत्यंत कठीण ठरत होते.
40 ते 50 फूट खोल विहिरीत अपघात (Well Drowning Incident in Khed)
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र विहिरीची खोली अधिक असल्याने स्थानिकांना प्रयत्न करूनही यश येत नव्हते. पोलीस पाटील यांनी तत्काळ पोलिसांना कळविले.
यानंतर खेड पोलिसांनी अग्निशामक दल आणि आपत्कालीन बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण केले. रविवारपासून सोमवार दुपारपर्यंत शोधमोहीम सुरू होती, तरीही मुलाचा शोध लागत नव्हता.
स्वयंसेवी संस्थांची धाव; 10 मिनिटांत मृतदेह बाहेर (Rescue Operation by Volunteers)
घटनास्थळी झालेली गर्दी पाहून वारंगवाडी येथील नागरिकांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेशी संपर्क साधला. संस्थेचे सदस्य अविनाश कार्ले आणि संस्थापक निलेश गराडे यांना माहिती देण्यात आली.
त्यानंतर संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी धाव घेतली. वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र, लोणावळा यांच्या संयुक्त प्रयत्नातून अवघ्या दहा मिनिटांत मुलाला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
या शोध मोहिमेत निलेश गराडे, गणेश गायकवाड, मयुर चौधरी, जिगर सोळंकी आणि राजेंद्र बंडगे यांनी सहकार्य केले. त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी मृतदेह खेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
घोटवडी परिसरात हळहळ; भोते कुटुंबावर शोककळा (Village in Mourning)
या दुर्दैवी घटनेमुळे घोटवडी आणि परिसरात शोककळा पसरली आहे. लहानग्या कैवल्यच्या अकाली मृत्यूने भोते कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
ही बातमी वाचा :
