पुणे : पुणे जिल्हा आणि पश्चिम घाटमाथ्यावरील डोंगरी भागांमध्ये पावसानं अत्यंत रौद्र रूप धारण केलं आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली असली, तरी पूर परिस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. पुण्याची जीवनवाहिनी समजले जाणारे खडकवासला धरण (Khadakwasla Dam) 6 जुलै रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत 32 टक्के क्षमतेनं भरलं आहे. धरण क्षेत्रात पडणारा पाऊस आणि पाण्याचा वाढता वेग पाहता, पुढील 24 तासांत हे धरण 80 टक्के किंवा त्याहून अधिक भरण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

पावसाचा जोर असाच राहिल्यास धरणाच्या सांडव्यावरून कधीही नदीपात्रात पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांना आणि सखल भागातील नागरिकांना तात्काळ सतर्कतेचा इशारा (High Alert) दिला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, तसेच जनावरे आणि साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Pune Ujani Dam Update : इंद्रायणी नदीने ओलांडली धोका पातळी

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावरील अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. इंद्रायणीचे हे सर्व पाणी भीमा नदीला येऊन मिळत आहे. सध्या दौंड बंधाऱ्यातून तब्बल 27 हजार 847 क्युसेक वेगाने भीमा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सोलापूर आणि पुणे जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाची (Ujani Dam) पाणी पातळी आता झपाट्याने वाढू लागली आहे.

Continues below advertisement

नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथक 24 तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Khandala Landslide Railway Update : मंकी हिल आणि खंडाळा दरम्यान दरड कोसळली

दुसरीकडे, मुसळधार पावसाचा मोठा फटका मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीला बसला आहे. लोणावळा-कर्जत दक्षिण-पूर्व घाट विभागातील मंकी हिल (Monkey Hill) आणि खंडाळा स्थानकांदरम्यान कि.मी. 121 आणि 123 च्या परिसरात डोंगराची मोठी दरड कोसळली आहे. रेल्वे रुळांवर मोठमोठे दगड, खडक आणि मातीचा ढिगारा आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी विभाग, शेकडो कामगार आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. घाटात सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि धुक्यामुळे ढिगारा हटविण्याच्या कामात मोठे अडथळे येत आहेत. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षिततेचे सर्व निकष पाळून हा मार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

ही बातमी वाचा: