पुणे : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाला (Jejuri Khandoba Mandir) भंडारा वाहिला जातो आणि याच भांडाऱ्यात भेसळ होत असल्याचा आरोप माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी केला आहे. याची थेट तक्रार त्यांनी अन्न व औषध मंत्री नरिहार झिरवाळ यांच्याकडे केली आहे. आता मंत्री महोदय काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 

खंडोबाचे लेन म्हणजे भंडारा, खंडोबाला वाहायला जाणाऱ्या भंडाऱ्यात भेसळ होत असल्याची तक्रार थेट अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली आहे. खंडोबाच्या जेजुरीत मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात आणि इथे येणाऱ्या भाविकांना भेसळयुक्त भंडारा विकला जात असल्याचा आरोप देवस्थानचे माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी केला.

वर्षभरात आठ ते नऊ यात्रा

अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आणि बहुजनांचा देव म्हणून जेजुरीच्या खंडोबाची ओळख आहे. दर महिन्याला लाखोच्या संख्येने भाविक जेजुरीमध्ये येत असतात. तसेच जेजुरीच्या वर्षभरात आठ ते नऊ यात्रा भरतात आणि याच काळात मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण केली जाते.

जेजुरीत महिन्याकाठी साधारणता साडेतीन ते पाच लाख भाविक येतात. यात्रा जत्रांच्या काळात हा आकडा वाढतो. सोमवती अमावस्या यात्रेला साधारपणे एक ते दीड लाख भाविक जेजुरीत असतात. वर्षाकाठी साधारणपणे काही टन भंडारा उधळला जातो आणि याच भंडाऱ्यात भेसळ होत असल्याचा आरोप माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी केला. तर या आरोपावरती विद्यमान विश्वस्त मंडळांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 

जेजुरी मंदिर सातत्याने चर्चेत

गेल्या काही वर्षापासून जेजुरी सातत्याने चर्चेमध्ये येऊ लागली आहे. मग विश्वस्तांच्या नेमणुकीला झालेला विरोध असेल किंवा विश्वस्तांनी घेतलेला वस्त्र संहितेचा निर्णय असेल किंवा मल्हार सर्टिफिकेशन वरून झालेला वाद असेल. आता त्यात नव्याने भर पडते आहे ती भेसळयुक्त भंडारा विकला जात असलेल्या आरोपाची. अनेक भाविक या जेजुरीत दाखल होतात. ते खंडोबाच्या चरणी लीन होण्यासाठी आणि याच खंडोबाच्या भंडाऱ्यात जर भेसळ होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. यावर ती आता मंत्री महोदय काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

ही बातमी वाचा: