पुणे : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर (Jayant Narlikar) यांचं पुण्यात निधन झालं आहे. डॉ. जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी जयंत नारळीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. आंतरराष्ट्रीय स्तरावर जयंत नारळीकर यांची खगोलशास्त्रज्ञ अशी ओळख मान्य झाली होती. त्यांनी मराठी विज्ञान कथांचं लेखन देखील केलं. केंब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत काम केलं, त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. डॉ. जयंत नारळीकर हे 2021 मध्ये नाशिकला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. भारत सरकारनं त्यांना पद्मभूष, पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं, याशिवाय त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देखील मिळाले होते.
डॉ. जयंत नारळीकर हे आधुनिक खगोलशास्त्राचे उद्गाते होते, त्यांच्या निधनानं एक पर्व संपलं, अशी भावना खगोल शास्त्राचे अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी व्यक्त केली. जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूरचा होता. बनारस हिंदू विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर ते केंब्रिज विद्यापीठात शिक्षणासाठी गेले. जयंत नारळीकर यांनी तिथं डॉ. फ्रेड हॉएल यांच्या मार्गदर्शान विश्वाच्या उत्पत्तीसंदर्भात संशोधन करुन सिंद्धात मांडला. त्या काळात हॉएल नारळीकर थेअरी प्रसिद्ध झाली होती.
इंदिरा गांधी यांनी भारतात बोलावलं
1972 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जयंत नारळीकर खास बोलावून घेतले आणि ते टाटा मुलभूत संशोधन संस्थेत ते दाखल झाले. आजचं खगोल शास्त्राचं स्वरुप आहे ते आणण्यात डॉ. जयंत नारळीकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. विद्यापीठ अनुदान आयोगानं 'आयुका' (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनोमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स) संस्था स्थापन करण्याचं निश्चित केलं होतं. त्याची जबाबदारी डॉ. जयंत नारळीकर यांच्याकडे देण्यात आली होती. डॉ. नारळीकर यांनी जागतिक दर्जाची संस्था कशा पद्धतीची असावी हे लक्षात घेत सुरुवातीपासून आखणी केली. देशभरातील खगोलशास्त्राच्या संस्था आहेत, त्या जे कार्यरत आहेत, ते सगळे नारळीकर यांनी सुरु केलेल्या संस्थेत घडले. खगोलशास्त्र सामान्य लोकांपर्यंत घेऊन जावं, असं त्यांना वाटत होतं.
डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी डॉ. मंगला नारळीकर यांचं दोन वर्षांपूर्वी निधन
डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी डॉ. मंगला नारळीकर यांचं 17 जुलै 2023 रोजी निधन झालं होतं. त्या देखील लेखिका होत्या. लहान मुलांना अगदी सोप्या भाषेत गणित समजावून सांगणाऱ्या लेखिका म्हणून त्यांची ओळख होती.
डॉ. जयंत नारळीकर यांची साहित्य संपदा
अंतराळातील भस्मासुर अंतराळातील स्फोट अभयारण्यचला जाऊ अवकाश सफरीलाटाइम मशिनची किमया प्रेषित यक्षांची देणगी याला जीवन ऐसे नाव वामन परत न आला व्हायरस
डॉ. जयंत नारळीकर यांना मिळालेल पुरस्कार
पद्मभूषण (1965) पद्मविभूषण (2004) राष्ट्रीय विज्ञान संस्थेने इंदिरा गांधी पुरस्कार (1990) युनोस्कोचा 'कलिंग पुरस्कार' (1996)फ्रेंच सरकारचा 'प्रिक्स जोन्सन' पुरस्कार (2004)