पुणे : निवडणुकीत भाजप सगळीकडे पोलिसांच्या मदतीने पैसे वाटणार आहे. त्यात सगळा काळा पैसा भाजप बाहेर काढणाकर. त्यासोबतच भाजप सगळं हायजॅक करणार आहे, असा आरोप पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपवर केला आहे. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी जी आश्वासने दिली ती पूर्ण केली नाहीत, असाही हल्लाबोल त्यांनी केला आहे. पुण्यामध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धांगेकर यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांचा रोड शो होणार आहे. सोमवारी पुण्यात मतदान होत आहे आणि आज पुण्यात प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. धंगेकर यांच्या प्रचारासाठी हा रोड शो काढला जाणार आहे. या रोडशो पूर्वी शेवटचा दिवस असल्याने प्रचाराचा उत्साह शिगेला पोहचला आहे.


मी निवडणूक आयोगाला पत्र देणार आहे.हा पैसा वाटप सुरु असल्याचं सांगत त्यांच्याकडे रितसर तक्रारपत्र दाखल करणार आहे. पुण्यात चांदी, सोनंदेखील आलं आहे. गणपती मंडळांना त्याचं वाटप सुरु आहे. मीदेखील गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे. या मंडळांनी बाजू मांडणारा विधानसभेचा आमदार आहे. त्यांच्या सोबत मी काम केलं आहे. सुखदु:खात मी आहे. त्यामुळे गणपती मंडळांना कितीही पैसा दिला तरीही सगळे माझ्याबरोबर राहतील, मलाच साथ देतील, असा दावा धंगेकरांनी केला आहे. 


हिंदू-मुस्लिमांमध्ये विभाजन करायचं हे भाजप आणि महायुतीकडे शेवटचं हत्यार आहे. दोन जातींमध्ये विभाजन केल्याशिवाय त्यांच्याकडे जिंकण्यासाठी पर्याय उपलब्ध नाही आहे. मात्र राज ठाकरे कालच्या सभेत कमळाला मत द्या, असं कुठेही म्हणले नाहीत. पुणे बकाल झालं आहे हे त्यांनीच जाहीर केलं आहे. आता पुढच्यावेळी ते येतील तेव्हा भाजपमुळे पुणं बकाल झालं, असं राज ठाकरे म्हणतील, असाही टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.