पुणे: पुणे शहरातील नाना पेठ परिसरात शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी आंदेकर टोळीने नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेतला. आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या केली. आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी १९ वर्षांच्या आयुष कोमकरवरती तब्बल ११ गोळ्या झाडल्या. यातील ९ नऊ गोळ्या आयुषच्या शरीरात आढळल्या आहेत. हल्लेखोरांनी बेसमेंटमध्ये दबा धरून आयुषची हत्या केली. या हत्येनंतर आयुषची आई कल्याणी कोमकरने आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल केला होता. पण हा गुन्हा दाखल व्हायच्या आधीच आंदेकर कुटुंब फरार झालं. एकीकडे गणेश उत्सव आणि दुसरीकडे पुण्यात झालेली ही हत्या, यामुळे आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. आता अखेर सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात मोठी कारवाई केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली आहे. यापूर्वी यश पाटील आणि अमित पोटोळे असं दोघांना अटक केली होती. आता अटकेतील आरोपींचा आकडा आठवर पोहोचला आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा महाराष्ट्राबाहेरून बंडू आंदेकर याच्यासह स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, त्यांची आई आणि इतर दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
आयुषच्या पार्थिवाला अग्नी देताच रात्री सगळ्यांना उचललं
आयुष कोमकर याच्यावर काल (सोमवारी) मोठ्या पोलिस बंदोबस्तात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील फरार आरोपींना राज्याबाहेरून अटक केली आहे. या प्रकरणात आधी गुन्हा दाखल होता, त्यामधील सहा आरोपांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, वाडेकर आई यांच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र पोलिसांना सहा जणांना अटक केली. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडूअण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील (सर्व रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान मागील वर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा बदला या खुनाद्वारे घेण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो क्लासवरून दुचाकीवरून आला त्यावेळी पार्किंगमध्ये त्याच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या.