Pune puran poli places : होळी रे होळी पुरणाची (Pune puran poli places) पोळी. होळीला प्रत्येकाचा घरातून लुसलुशीत पुरणपोळीचा सुगंध येतो. प्रत्येक घरात पुरणपोळीवर ताव मारला जातो. मात्र पुण्यात अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यामुळे त्यांना घरातील पुरणपोळी मिळणं शक्य होत नाही. सणासुदीच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येकाला खास वेगवेगळ्या पदार्थांसाठी घरची आठवण येत असते. हेच पारंपारिक पदार्थ हॉटेल्समध्ये नीट मिळत नाही अशा अनेकांच्या तक्रारी असतात मात्र आता हवी तेव्हा पुरण पोळी तुम्हाला मिळू शकते. पुण्यातील असे काही हॉटेल्स आहेत ज्या हॉटेलमध्ये एकदम चविष्ठ पुरणपोळी मिळते.
चितळे बंधू मिठाईवाले
कोणत्याही मिठाईसाठी पुण्यातील चितळे बंधू मिठाईवाले प्रसिद्ध आहे. त्यासोबतच चितळेंची बाकरवडीही जगात प्रसिद्ध आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच चितळे बंधुंची पुरणपोळीही चांगलीच पुणेकरांच्या पसंतीस उतरली आहे. पुण्यात चितळेचे अनेक दुकानं आहे. मात्र त्यांच्या काहीच परिसरातील दुकानांमध्ये पुरण पोळी मिळते.
कुठे: बाजीराव रोड आणि डेक्कन जिमखाना या दोन भागातील दुकानात उत्तम पुरण पोळी मिळते.
हॉटेल श्रेयस
पुरणपोळी आणि इतर महाराष्ट्रीयन पदार्थांची चव चाखण्यासाठी हे आणखी एक लोकप्रिय ठिकाण आहे. शहरातील सर्वात जुन्या हॉटेल्सपैकी एक ठिकाण आहे. हे प्रसिद्ध शाकाहारी रेस्टॉरंट खास महाराष्ट्रीयन थाळी आणि स्वादिष्ट पुरण पोळी आणि मोदक, आमरस, रसमलाई आणि बासुंदी यांसारख्या विविध मिठाईसाठी प्रसिद्ध आहे.
कुठे: आपटे रोड, डेक्कन जिमखाना.
ईशान फूड्स
अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ खाण्यासाठी पुणेकरांचे हे सर्वात आवडते ठिकाण आहे. अगदी स्वादिष्ट पुरण पोळीपासून ते वरण-भात, साबुदाणा वडा, बटाटा वडा यांसारख्या मसालेदार स्ट्रीट फूडपर्यंत आणि बरेच पदार्थ मिळतात. त्यात ईशान फूड्सची पुरण पोळी सर्वात प्रसिद्ध आहे.
कुठे: 691A-1A, CTC NO 1897-B, सातारा रोड, बिबवेवाडी
शबरी
अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थासाठी पुण्यातील शबरी हॉटेल प्रसिद्ध आहे. पारंपारिक जेवण आणि अस्सल मराठमोळे गोड पदार्थ्यांसाठी शबरी हॉटेल प्रसिद्ध आहे. दुधी हलवापासून ते पुर्ण पोळीपर्यंत सगळ्या गोड पदार्थांवर बिनधास्त ताव मारु शकता.
कुठे: शबरी रेस्टॉरंट, टाकुराम पादुका चौक, फर्ग्युसन कॉलेज आरडी, शिवाजीनगर, पुणे.
घरापासून दूर राहणाऱ्यांसाठी ही काही ठिकाणं त्यांच्यासाठी घराची आठवण विसरायला लावणारे आहे. होळीच्या दिवशी या ठिकाणची पुरण पोळी नक्कीच टेस्ट करायला हवी.