पुणे: मागील काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिंजवडीतील सर्व समस्या जाणून घेऊन त्या तातडीने सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या, त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार (Ajit Pawar) हिंजवडीत पाहणी दौरा करत आहेत. दोन आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचा पालन करत त्यांनी विकास कामांना सुरुवात केली की नाही याची पाहणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर प्रशासन कामाला लागले आहे. हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात आहे. दरम्यान अद्यापही या कामांच्या मध्ये काही जण येत असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी अजित पवारांना सांगितले त्यावेळी त्यांनी कामामध्ये येणाऱ्यावर 353 लावा म्हणत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, तर यावेळी अजित पवारांनी हिंजवडीच्या संरपंचांना देखील खडेबोल सुनावले आहेत.
आपलं वाटोळं झालं, आयटी पार्क बेंगलोर अन् हैद्राबादला चालले
कामाची पाहणी करत असताच अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना देखील सुनावल्याचं दिसून आलं. ते सरपंच अजित पवारांशी बोलत असताना ते म्हणाले, अहो असू द्या हो असू द्या हो साहेब, धरण करताना मंदिर जातातच की नाही. तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो, पण मी काय करायचं तेच करतो...आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बाहेर चाललाय...माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर....बेंगलोरला हैदराबादला ...काय तुम्हाला पडलं नाही....कशाला मी सहा वाजता पाहणी करायला येतो इथं, मला कळत नाही माझी माणसं नाहीत...हे केल्याशिवाय गत्यंतर नाही... असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर खडेबोल सुनावले आहेत.
कोणीही मध्ये आलं तर त्यावर 353 टाका
अजित पवारांनी पहाटेच घेतली अधिकाऱ्यांची शाळा घ्यायला सुरूवात केली. आपलं असं ठरलंय कामाच्यामध्ये कोणी आला तर त्यावर 353 दाखल करा.तो कोणीही असेल तरी करा.अजित पवार जरी मध्ये आला तरी 353 दाखल करायचा. बाकीचं कोणाचं काय ठेवायचंच नाही. 353 लावायचा कारण त्याच्याशिवाय हे काम होणार नाही. नाही प्रत्येक जण माझं हे करा माझं ते करा असं करत राहिलं,आपल्याला संपूर्ण काम करून टाकायचं आहे, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.
पहाटेच्या सुमारास अजित पवार ऑन फिल्ड
पहाटेच्या सुमारास अजित पवारांनी हिंजवडी मध्ये सर्व समस्यांची पाहणी केली. रस्ते वाहतूक कोंडी आणि इतर नागरी समस्यांबाबत अजित पवार पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी अजित पवारांनी कोणी विकास कामांच्या आड आलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा. असे स्पष्ट सूचना दिली आहे. कोणी मध्ये आलं तर त्याला एकदा समजून सांगा नाहीतर त्याच्यावर 353 लावा अगदी अजित पवार देखील मध्ये आला तर त्याच्यावर देखील 353 लावा असं म्हणत अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी हिंजवडीतील याच बांधकामांची पाहणी केली होती. त्यावेळी मेट्रो प्रशासन आणि पीएमआरडीए प्रशासनाला सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत का? हे पाहण्यासाठी अजित पवार पुन्हा आले आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.