पुणे : पुढच्या आठ दिवसात किंवा महिन्याभरात मला एखादं पद मिळालं तर तालुक्यातील जो 10 टक्के वर्ग मला सोडून गेला, तो पटापट माघारी फिरेल असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलं. काल काय झालं याचा विचार कधीच केला नाही, उद्या काय करायचं ते पाहू असंही ते म्हणाले. इंदापुरात कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना हर्षवर्धन पाटलांनी हे वक्तव्य केलं.
हर्षवर्धन पाटील यांचा इंदापुरात सलग तिसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर काही पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना सोडून गेले. त्यांच्यावर बोलताना हर्षवर्धन पाटलांनी हे वक्तव्य केलं. हर्षवर्धन पाटील सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असून त्यांच्याकडे राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्षपदही आहे.
Harshvardhan Patil Indapur Speech : नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन पाटील?
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, "माझ्या कार्यकर्त्यांचे आणि माझं नातं काही पदापुरतं नाही. एक दहा टक्के वर्ग असा आहे जो सोडून गेला. पुढच्या आठ दिवसात, महिन्याभरात मला जर पद मिळालं तर ते पटापटा येतील आपल्याकडे. मग निष्ठावंताना ते बाजूला सारण्याचा प्रयत्न करतात. पण मी वाटच बघतोय अशी लोक कधी माझ्याकडे परत येणार ते. मला पण राजकारणात चाळीस वर्षे झाली आहेत. परिस्थिती बदलते, चिंता कधीच करायची नाही."
काल काय झालंय त्याचा विचार कधीही हर्षवर्धन पाटलाने केला नाही. उद्या काय करायचं ते बघुयात असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत पराभव
विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये होते. भाजपमध्ये असताना त्यांना देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्षपद दिले होते. परंतु इंदापूरची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला जाणार हे नक्की झाल्यावर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. इंदापूर विधानसभेची निवडणूक तिरंगी झाली आणि त्याचा फटका हर्षवर्धन पाटलांना बसला. त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे निवडून आले.
मार्च महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंदारपूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील कुलदैवत असणाऱ्या श्री लक्ष्मी नरसिंहाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागताला हर्षवर्धन पाटलांनी उपस्थिती लावल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या.
ही बातमी वाचा: