Gopichand Padalkar : मुलीवर जबरदस्ती करुन व्हिडिओ केला, पोलिसांना, घरच्यांना व्हिडिओ पाठवला म्हणजे त्यांचं धाडस वाढतंय, गोपीचंद पडळकरांचा आरोप
Gopichand Padalkar : भिगवणमधील तरुणीचं अपहरण झाल्याची तक्रार झाल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर जनआक्रोश मोर्चासाठी भिगवणमध्ये पोहोचले.

पुणे : इंदापूर तालुक्यातील भिगवण (Bhigwan) परिसरात एका मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. या घडामोडींनतर भिगवणमध्ये हिंदू संघटनांच्यावतीनं मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चापूर्वी संबंधीत तरुणीनं व्हिडिओ शेअर केला आहे. संबंधित मुलीनं अपहरण झालं नसून मर्जीनं तरुणासोबत आल्याचं म्हटलंय. या दरम्यान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर भिगवणमध्ये दाखल झाले आहेत.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणाले?
मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करुन पोलीस अधिकारी, त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जात असल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केली आहे. मुलीला वडील नाहीत. मुलीचं लग्न ठरलेलं होतं, दोन चार दिवसात लग्न होणार होतं, अशा परिस्थितीत जबरदस्तीनं मुलीचं अपहरण केलं गेलं आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. मुलीचं अपहरण झाल्यानं भिगवणला आलो आहे. भिगवण पोलीस स्टेशनला भेट देणार आहे. हिंदू समाज संतापलेला आहे. हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. बाकीची सविस्तर चर्चा पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांसोबत करणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसोबत फोनवर चर्चा केली आहे. हा व्हिडिओ कोठून आला असा प्रश्न विचारला. लोकेशन न दिसणारं एप वापरलं आहे, असं पोलिसांनी सांगितल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले.
पोलिसांना व्हिडिओ पाठवणं, घरच्यांना व्हिडिओ पाठवणं म्हणजे त्यांचा धाडस वाढलं आहे. या मुलाला वाचवण्याचा कोणीतरी प्रयत्न करतंय असा त्याचा अर्थ आहे. मुलाचे चुलते इथले गुंड आहेत. हिंदू मुलींच्या अपहरणात तो आरोपी होता. काही महाराजांना मारहाण केलेली आहे. मंदिरामध्ये ते कब्जा घेत आहेत, मंदिरातील मूर्तींची मोडतोड केलेली आहे, असं का घडतंय असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पोलीस प्रशासन इतके दिवस का गप्प आहे, असा सवाल देखील गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यात तो आरोपी आहे, माझ्याकडे यादी आहे. इतक्या गुन्ह्यात तो आरोपी असेल तर त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई का झाली नाही, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांसोबत सविस्तर चर्चा करुन आपल्यासमोर मांडणार असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले.
भिगवण प्रकरणाचा घटनाक्रम
17 फेब्रुवारी रोजी दुपारी साडे तीन वाजता मुलगी, तिचा भाऊ आणि आई लग्नाची खरेदी करुन जात असताना डोळ्यात चटणी टाकण्यात आली आणि मुलीचं अपहरण झाल्याची घटना घडली.
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांकडून तपासासाठी सहा पथकांची स्थापना करण्यात आली. या घटनेमुळं मोठा रोष निर्माण झाला. यानंतर रात्री उशिरा हिंदुत्त्ववादी संघटनांकडून भिगवण पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला. यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावर रोखण्यात आला. यानंतर जनआक्रोश मोर्चाची घोषणा करण्यात आली.
आज सकाळपासून जनआक्रोश मोर्चाची तयारी सुरु करण्यात आली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप जनआक्रोश मोर्चाला उपस्थित राहणार असल्याची माहिती.
जनआक्रोश मोर्चा 4 वाजता सुरु होण्यापूर्वीचं संबंधित मुलीचा व्हिडिओ समोर आला. गोपीचंद पडळकर यांच्याकडून मुलीवर दबाव टाकून व्हिडिओ तयार केला गेल्याचा आरोप करण्यात आला.
पोलिसांच्या तपासात संबंधित मुलगी आणि मुलगा यांच्यात महिनाभरात चर्चा झाल्याची माहिती कॉल रेकॉर्ड तपासलं असता समोर आहे.
























