Goodluck Cafe News : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफेमध्ये बन मस्कामध्ये काचेचा तुकडा सापडल्यानंतर आता तशाच प्रकारची घटना पुन्हा घडली आहे. मुंबई-पुणे हायवेवरील फूड प्लाझामध्ये असलेल्या गुडलक कॅफेमध्ये अंडा भुर्जीमध्ये झुरळ आढळल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे पुन्हा एकदा गुडलक कॅफे चर्चेत आला आहे. काहीच दिवसात अशा प्रकारची दुसरी घटना घडल्यानंतर गुडलक कॅफेच्या स्वच्छतेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पुणे-मुंबई हायवेवर असलेल्या गुडलक कॅफेमधून एका व्यक्तीने अंडा भुर्जी घेतली. त्या भुर्जीमध्ये त्याला मेलेले झुरळ सापडल्याचा आरोप त्याने केला आहे. संबंधित व्यक्तीने त्याचे फोटो शेअर केले आहेत. तसेच सोबत अंडा भुर्जी घेतल्याचं बिलही शेअर केलं आहे. त्यामुळे गुडलक कॅफेचे बॅड लक सुरूच असल्याची चर्चा सुरू आहे.
पुण्यातील गुडलक तात्पुरते बंद
काही दिवसांपूर्वी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफेमध्ये बन मस्कामध्ये काच सापडली होती. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाकडून गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गुडलक कॅफे बंद ठेवण्यात आला आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाकडून गुडलक कॅफेला काही त्रुटी सांगण्यात आल्या आहेत. त्याची पूर्तता केल्यानंतर गुडलक कॅफे सुरु करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच दुसऱ्या कॅफेमध्ये झुरळ आढळल्याने खळबळ उडाली आहे.
या आधी पुण्यातील बन मस्कामध्ये काचेचा तुकडा सापडल्यानंतर अन्न आणि औषध विभागाने गुडलक कॅफेची तपासणी केली होती. त्यामध्ये त्यांना काही त्रुटी सापडल्या होत्या. त्यानुसार सूचनांचे पालन करेपर्यंत गुडलक कॅफे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
FDA ला गुड लक कॅफेमध्ये कोणत्या त्रुटी आढळल्या?
- कॅफेमध्ये काम करणाऱ्या कामगारांकडे मेडिकल सर्टिफिकेट नाही.
- किचनमधील टाईल्स तुटलेल्या आहेत.
- काही ठिकाणी पाणी साचलंय.
- फ्रिजमध्ये घाण आहे.
- किचनमधील आणि बाहेरच्या बाजूला असलेल्या कचरपेट्या उघड्या आहेत
सन 1935 साली Hussain Ali Yakshi यांनी हे कॅफे सुरू केल होतं. आता त्यांची तिसरी पिढी हा कॅफे चालवत आहे. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर हे इराणी कॅफे आहे. या ठिकाणी बन मस्का, खिमा पाव आणि कॅरेमल पुडिंग खाण्यासाठी लोकांची, विशेषतः तरुण तरुणींची मोठी गर्दी असते.
ही बातमी वाचा: