मुंबई, दि. 03 : पुणेकरांसाठी एक आंनदाची बातमी आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी 2 स्थानके पुण्याला मिळणार आहेत, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 683 कोटीं मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-2 च्या विस्तारित मार्गावर स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवर दोन नवीन स्थानके उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बालाजीनगर व बिबेवाडी येथे ही दोन मेट्रो स्थानके उभारली जाणार असून त्यासाठी येणाऱ्या 683.11 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-2 च्या विस्तारित मार्गावर स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवर दोन नवीन स्थानके उभारण्याच्या निर्णयामुळे पुणे शहरातील दक्षिण भागातील नागरिकांसाठी मेट्रो प्रवास अधिक सुलभ होणार असून वाहतूक कोंडी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.
या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेचा 227.42 कोटी रुपये, ‘ईआयबी’चे द्वीपक्षीय कर्ज 341.13 कोटी रुपये, तर राज्य करांसाठी राज्य शासनाचे दुय्यम कर्ज 45.75 कोटी रुपये व व्याज रक्कमा राज्य शासनाचे अतिरिक्त बिनव्याजी दुय्यम कर्ज 68.81 कोटी रुपये अशा मिळून एकूण 683.11 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पुणे मेट्रो टप्पा-2 चा विस्तार अधिक कार्यक्षम होऊन पुणेकरांना आधुनिक, जलद आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळणार आहे.
आजच्या मंत्रीमंडळात मेट्रोस्थानकांना मंजूरी
ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुण्यातील मेट्रो मार्गिका – 2, मार्गिका – 4 तसेच नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनच्या कर्जांस मान्यता
ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, स्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, वनाज ते रामवाडी (मार्गिका क्र. 2) च्या विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी), पुणे मेट्रो मार्ग-4 (खडकवासला स्वारगेट हडपसर-खराडी) आणि नळ स्टॉप वारजे-माणिकबाग (उपमार्गिका) व नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा-2 या मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी घेण्यात येणाऱ्या बाह्यसहाय्यित कर्जाचे आकस्मिक दायित्व स्वीकारण्यास, प्रकल्पांचे करारनामा, कर्ज करारनामा आणि दुय्यम वित्तीय करारनामे करण्यास मान्यता.
पुणे मेट्रोवरील बालाजीनगर, बिबवेवाडी या दोन नवीन स्थानकांना मंजूरी
स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर बालाजीनगर व बिबवेवाडी ही दोन नवीन मेट्रो स्थानके उभारण्यास आणि कात्रज मेट्रो स्थानकाचे दक्षिणेकडे सुमारे 421 मीटरने स्थलांतरण करण्यास व यासाठीच्या 683 कोटी 11लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता.