पुणे: वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणामध्ये(Vaishnavi Hagawane Death) अनेक बाबी समोर आल्या. वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबीयांनी (Rajendra Hagawane) बडेजाव करण्यासाठी चक्क त्यांच्या बैलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यातील प्रसिद्ध नृत्य कलाकार गौतमी पाटील (Gautami Patil) यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे समोर आले होते. दरम्यान या प्रकरणी आता गौतमी पाटीलने देखील प्रतिक्रिया दिली आहे. वैष्णवी हगवणे बरोबर जे झालं ते चुकीचं आहे. महिलांवर, मुलींवर जर अत्याचार होत असतील तर त्यांनी लगेच ते त्यांच्या आई-वडिलांना सांगितलं पाहिजे. ते सहन करणे चुकीचं आहे. हुंडा देणे, पैसे, गाड्या देणे हे चुकीचं आहे. मुलगी दिली ती घराची लक्ष्मी असते, हुंडा देणे हे चुकीचं आहे. मी त्याचा तीव्र विरोध करते, असंही गौतमी पाटील म्हणाली.
बैलांसमोर नाचलेल्या कार्यक्रमावरती बोलताना गौतमी पाटील म्हणाली, काही महिन्यांपूर्वी राजेंद्र हागवणेने एका कार्यक्रमासाठी मला बोलवलं होतं. त्यावेळी बैल जोड्यांच्या समोर मी नाचले होते. कोण आयोजक आहे, मी ते बघत नाही. मी फक्त तिथे जाऊन स्टेजवर परफॉर्म करते आणि निघून येते. माझं बाकीच्या गोष्टींशी काहीही घेणं देणं नसतं, असंही गौतमीने यावेळी बोलताना सांगितलं.
ही घटना फार दुर्दैवी आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झाली पाहीजे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोणत्याही गोष्टी लपवू नका. जे काही असेल ते सांगत जा. जे काही असेल ते पुढे येऊन बोललं पाहिजे. हुंडा देणे, पैसे, गाड्या देणे हे चुकीचं आहे. मुलगी दिली ती घराची लक्ष्मी असते, हुंडा देणे हे चुकीचं आहे. मी त्याचा तीव्र विरोध करते, असंही गौतमी पाटील म्हणाली.
वैषाणवीच्या वडीलांची प्रतिक्रिया पाहिली. ते ऐकून, पाहून फार वाईट वाटलं. तुमच्या आयुष्यावर फक्त परिणाम होत नाही तर तुम्ही जो निर्णय घेता, जसे वागता त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. त्यामुळे काहीही असो सगळं सांगा. हुंडा घेणाऱ्यांनी देखील ती एक लक्ष्मी आहे, ती आपल्या घरी आली आहे, म्हणून तिच्याकडे पाहावं असंही गौतमी पाटील म्हणाली आहे.
लाडक्या बैलाच्या वाढदिवशी दणक्यात साजरा
हगवणे कुटुंबीयांच्या एका लाडक्या बैलाच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठ्या कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या या कार्यक्रमाची चर्चा राज्यभरात झाली होती. बैलाच्या बर्थडे पार्टीला प्रसिद्ध नृत्य कलाकार गौतमी पाटीलला चक्क बैलासमोर नाचवण्याचा उद्योग हगवणे कुटुंबीयांनी केला होता. याच कार्यक्रमाचे व्हिडिओ काही दिवसांपासून पुन्हा एकदा सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावर आपल्या ठसकेबाज नृत्यामुळे लोकप्रिय ठरलेली लावणी कलाकार गौतमी पाटील या कार्यक्रमामुळे चर्चेत आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हगवणे कुटुंबीयांच्या लाडक्या बैलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्या कार्यक्रमात गौतमी पाटील हिचं नृत्य हे मुख्य आकर्षण होतं. विशेष म्हणजे ती चक्क बैलासमोर नाचताना दिसत आहे. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. सामान्यतः हजारोंच्या गर्दीत स्टेजवर नाचणारी गौतमी यावेळी मात्र एका बैलासाठी खास नाचत होती, आणि ती दृश्यं पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.