पुणे : कचरा कोंडीमुळे ग्रासलेल्या पुण्यातील ऊरळी कांचन आणि फुरसुंगीकरांना आता कचरा कोंडीतून कायमची सुटका होणार आहे. 31 डिसेंबर 2019 पर्यंत ऊरळी कांचन इथला कचरा डेपो कायमचा बंद होणार असल्याचं जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितलं.


गेल्या काही वर्षांपासून ऊरळी कांचन, फुरंसुगी परिसरात पुणे शहराचा कचरा टाकला जायचा. याचे परिणाम इथल्या गावकऱ्यांना भोगावे लागले असून प्रसंगी शेतीचं नुकसानही झालं. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून हा कचरा डेपो इथून कायमचा हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन झालं.

पालिकेच्या कचरा गाडया आडवणे, आंदोलन यामुळे हा प्रश्न नेहमीच चर्चेत राहिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत हा प्रश्न सोडवला होता. पण गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर हा कचरा डेपो बंद करण्याबाबत पालिकेत विजय शिवतारे, अधिकारी ,गावकरी यांची बैठक झाली.

शहरातील सर्व कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल या करता नव्याने पाच कचरा प्रक्रिया प्रकल्प 31 मार्च 2019 पर्यंत सुरू केले जातील, असंही विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

काय आहे पुण्याचा कचरा प्रश्न?

पुण्यातील कचरा फुरसुंगी-ऊरळी या गावाजवळच्या कचरा डेपोत टाकला जातो. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली होती. ही आग अनेक दिवस धुमसत असल्याने फुरसुंगीकरांना जगणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे त्यांनी फुरसुंगीकरांनी पुणे शहरातील कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला.

इतकंच नाही तर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलनही केलं. 14 एप्रिल 2017 पासून फुरसुंगीकरांनी आंदोलन सुरु केलं होतं. 7 मे 2017 रोजी मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर फुरसुंगीकरांनी आंदोलन स्थगित केलं होतं.

पुणे शहरातून दिवसाला जवळपास 1700 मेट्रीक टन कचरा उचलला जातो. यापैकी जवळपास 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. राहिलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर फेकला जातो.

संबंधित बातम्या :

अखेर 23 दिवसांनी पुण्याची कचराकोंडी फुटली!


पुणे कचरा प्रश्न न सुटल्यास राजीनामा देऊ : मंत्री विजय शिवतारे

शिवसेनेने पुणे महापालिकेसमोर कचरा फेकला

पुण्यातील कचराकोंडी 20 व्या दिवशीही कायम

19व्या दिवशीही पुण्यातील कचराकोंडी कायम, सर्वत्र घाणीचं साम्राज्य

आयुक्त कुणाल कुमार पुण्यात, फुरसुंगी कचरा डेपोला भेट

पुण्याचा ‘कचरा’, सांस्कृतिक राजधानीची ‘कोंडी’

ग्रामस्थांकडून फुरसुंगी कचरा डेपोची अंत्ययात्रा, तर मनसेचंही आंदोलन

पुण्याच्या कचराप्रश्नी आता पंतप्रधान मोदींनी लक्ष द्यावं: सुप्रिया सुळे