पुणे: झोमॅटोचे डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून ते पहिल्यांदा रेकी करायचे. त्यानंतर चोरी करण्यासाठी जाताना वेगवेगळे जॅकेट, केसांचा विग, टोपी परिधान करुन वेशभूषा बदलत असे. अशा प्रकारे तिघांनी मिळून पुण्यात अनेक ठिकाणी चोरी केली. मात्र, पोलिसांनी कसून तपास केला, तेव्हा चोरांना पकडलं आणि सर्व सत्य बाहेर आलं. या तीन आरोपींकडून ८६ तोळे सोन्याचे दागिने, १५० हिरे, ३.५ किलो चांदी, १ दुचाकी वाहन, ०२ पिस्तूल, ०५ जिवंत राऊंड, व घरफोडी करण्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्र असा १ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


पुणे पोलिसांनी या वर्षातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. झोमॅटोचे डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून आरोपी रेकी करत होते. त्यानंतर त्या घरांमध्ये चोरी करत होते. या आरोपींना पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी  तब्बल ३००० पेक्षा अधिकचे सीसीटिव्ही फुटेज तपासले. गणेश काठेवाडे, सुरेश पवार आणि अजय राजपूत असे, तीन अटक केलेल्या आरोपींची नावे असून स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिस उपायुक्त (परिमंडळ २) स्मार्तना पाटील यांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, 'पुणे शहरातील विविध ठिकाणी झालेल्या घरफोडीचा तपास करत असताना आम्हाला माहिती मिळाली होती की, काठेवाडे हा यातील मास्टरमाईंड आहे. त्या अनुषंगाने तपास करत असताना तब्बल ३००० सीसीटिव्हीचे फुटेज तपासून आम्ही त्याला अटक केली. काठेवाडे याच्याकडे सखोल तपास करता त्याने झोमॅटो डिलीव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जावून रेकी करुन विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण १४ घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. स्वतःची ओळख लपवण्यासाठी काठेवाडे हा उच्चभ्रू सोसायटीमध्ये रहात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे'.


'या घरफोडी प्रकरणात काठेवाडे याचा साथीदार सुरेश पवार याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. या दोघांची ओळख कारागृहात झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर पुण्यातील विविध ठिकाणी घरफोडी करण्याचे दोघांनी ठरवले होते. याच प्रकरणात सोने विक्री करणारा व्यवसायिक अजय राजपूत याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणी सखोल चौकशी स्वारगेट पोलिसांकडून सुरू आहे. मुख्य आरोपीकडे झोमॅटो डिलीव्हरी बॉयचे कपडे देखील होते. गणेश काठेवाडे हा मकोका गुन्ह्यामधून जामिनावर सुटलेला असून त्याच्यावर पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण हद्दीमध्ये ५५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.


या संपूर्ण गुन्ह्यातील मुख्य आरोपी गणेश काठेवाडे घरफोडी करण्यापुर्वी झोमॅटो डिलीव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जावून रेकी करुन घरफोडी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचप्रमाणे पोलीस सीसीटिव्ही चेक करुन आपल्या पर्यंत पोहचू नयेत यासाठी तो घरफोडी करण्याच्या ठिकाणी येताना सुमारे ४० ते ५० किलोमीटरचा प्रवास करुन जात होते. घरफोडी करुन जाताना पुन्हा ४० ते ५० किलोमीटरचा प्रवास छोट्या-छोट्या गल्ल्यांमधून करुन जात असे. तसेच घरफोडी करुन जाताना व घरफोडी करण्यासाठी येताना स्वतःची ओळख लपवण्यासाठी विविध जॅकेट, केसांचा विग, टोपी परिधान करुन वेशभूषा बदलत असत. चोरीचे दागिने यातून आलेले पैसे त्याने गोवा व इतर ठिकाणी मौजमजेसाठी उडवून काही पैसे शेअर मार्केटमध्ये (इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये) गुंतवल्याचे निष्पन्न झाले आहे.